सौ.स्वाती चंद्रशेखर तेली, जामसंडे.
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन का केले जाते?
भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या आगमनात स्वागत केले जाते,आणि घराघरात बाप्पाला मानाचे स्थान देऊन विराजमान केले जाते.आणि
आराधना,सेवा करून गोडाधोडाचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला जातो.या दहा दिवसात सर्व भाविक खूप उत्साहात,आनंदात बाप्पाची सेवा करतात.आणि या दहा दिवसांच्या गणेशउत्सवानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने पण जड अंतकरणाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो.

या अनंत चतुर्थीच्या दिवशी बापाचे विसर्जन का केले जाते असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो याची एक कथा सांगितली जाते ती अशी की,
. ऋषी वेद व्यास यांनी ज्यावेळी संपूर्ण महाभारताची रचना करताना,त्यावळी ते सर्व लिहू शकत नव्हते… त्यानंतर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना सांगितले. गणपती बाप्पाला वेद व्यास यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणेशजींनी सलग दहा दिवस ती कथा लिहिली….
महाभारत पूर्ण सांगून झाल्यावर जेव्हा वेद व्यास यांनी आपले डोळे उघडले, त्यावेळी गणेशजींच्या शरीराचे तापमान खूपच वाढलेले दिसून आले… एकाच जागेवर दहा दिवस बसून राहिल्याने आणि सातत्याने लिहित राहिल्याने तापमान वाढले…
त्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी गणरायाच्या शरीरावर मातीचा लेप लावण्यात आला… त्यानंतर त्यांनी अंगातील तापमान कमी व्हावे म्हणून सरोवरात डुबकी घेतली…..
धार्मिक कथेनुसार, ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाची चतुर्थीचा दिवस होता… तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता…..
तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते…..
या गणेश विसर्जनाच्या दिवशी एक महत्वाचे व्रत केले जाते ते म्हणजे अनंत पुजनाचे!
भगवान शेषनागाचे एक नाव अनंत आहे.यासाठी श्रीहरीला अनंत म्हणतात. विष्णूंच्या वामन अवतारालाही ‘अनंत’ असे म्हटले जाते. या अवतारात अनंत भगवान यांनी आपल्या दोन पावलातच तिन्ही लोकांना पादाक्रांत केले होते. ज्याचा आदी माहित नाही आणि अंतही माहित नाही म्हणून ते अनंत! त्यांची पूजाअर्चा केल्यामुळे सगळे कष्ट दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते, संकटांचा परिहार होतो. भगवान विष्णूनी विश्वाची रचना करताना १४ लोकांची निर्मिती केली हे १४ लोक म्हणजे,
सात स्वर्ग लोक
भूलोक
भुवर लोक
स्वर लोक
महालोक
जनलोक
तपलोक
सत्यलोक
आणि सात पाताळ लोक
अतल
वितल
सुतल
महातल
रसातल
तलातल
पाताळ
असे आहेत.आणि याच्या रक्षणासाठी त्यांनी अनंत रूप धारण केले.
अशा अनंतमय विष्णूंची पूजा करून या दिवशी जे व्रत केले जाते त्याला ‘अनंत पूजन व्रत ‘म्हणतात.
हे व्रत विधिवत केल्याने मनुष्याच्या सर्व संकटांचा परिहार होतो
हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते. पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.
या पूजेचे स्वरूप
चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात.त्यावर पूर्णपात्र ठेवून अष्टदल काढतात. त्यावर सात फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेष नाग ठेवून त्याच्यापुढे हळदीने रंगविलेला चौदा गाठींचा दोरा ठेवतात.कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील जळाला यमुना म्हणतात. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची सोळा उपचारांनी पूजा करतात.अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा यामध्ये असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. नंतर दोरकाची प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. या दोऱ्याला कोकणात ‘तातू ‘ म्हणतात.जुन्या दोऱ्यांचे विसर्जन करतात. वडे आणि घारगे यांचे वाण देतात आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात. या व्रतात सर्पपूजेचे अवशेष दिसतात असे मानले जाते. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी असा संकेत मानला जातो.हरियाणात या दिवशी अनंताचे व्रत घेतात. पूजा करतात. हातात ‘अणत’ बांधतात.










