डाँ. नातू यांच्याकडून उमेदवारांचे कौतुक, योजनेमुळे युवकांना रोजगाराची संधी
गुहागर/प्रतिनिधी – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत राज्यात लाडके भाऊ ही योजना सुरु झाली आहे. या योजनेतंर्गत कोकण विभागातून ७ हजार ६९१ उमेदवार प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून सर्वाधिक चांगला प्रतिसाद ठाणे जिल्ह्यापाठोपाठ रत्नागिरीतील उमेदवारांनी दिला आहे. या सर्व उमेदवारांचे मी कौतुक करतो. भविष्यात रोजगाराच्या चांगल्या संधी या योजनेच्या माध्यमातून तरुणांना मिळतील, अशी अपेक्षा माजी आमदार डाँ. विनय नातू यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. विविध आस्थापनांमध्ये युवकांना कामासाठी प्रोत्साहित करून ६ महिन्यात किमान प्रशिक्षण द्यावे. त्या आधारे पुढील काळात या युवकांना चांगली रोजगार संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून ही योजना आखण्यात आली आहे.कोकण विभागामध्ये ७ हजार ६९१ उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू झाले असून १३ हजार ८८७ उमेदवारांची निवड झाली आहे. राज्याच्या तुलनेत कोकण विभागात कामासाठी हजर होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. ठाणे जिल्ह्याच्या पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनीही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संख्येपैकी ५० टक्क्याहून अधिक उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन महत्वाकांक्षी योजना सर्वच घटकांसाठी जीवनदायी ठरल्या आहेत. या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष करुन कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनीच यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन डाँ. नातू यांनी केले आहे.










