श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी दांडी यांनी वेधले मत्स्य विभागाचे लक्ष
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या मलपी हायस्पीड बोटिंवर ही कारवाईची मागणी | मत्स्य विभागाकडे हायस्पीड गस्ती नौकेचीही केली मागणी
अमित खोत ||मालवण : मत्स्य दुष्काळ जाहीर करून मच्छिमारांना सानुग्रह अनुदान द्यावे. अशी मागणी श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. दांडी मालवण यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर मलपी हायस्पीड बोटिंचा धुमाकूळ सुरु असून स्थानिक मच्छिमाऱ्यांच्या ज
जाळ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान करून मासळीची लूट केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच हायस्पीड गस्ती नौका लवकर उपलब्ध व्हावी. अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. दांडी मालवण यांनी मालवण मत्स्य कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागात मत्स्यदुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळयात बारदानी वा-यांनी सुरवातीचा मत्स्य हंगाम चांगला होईल अशी मच्छिमारांची आशा होती. पण सातत्याने प्रादेशिक हवामान विभागामार्फत मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयाकडून वादळी हवामानाबाबत येणा-या सुचनांच्या अनुषंगाने वातावरणातील सततच्या वादळी वातावरणामुळे मासेमारी करण्यास खंड पडला. त्यामुळे समुद्रातील मासेमारी करणा-या लहान मोठया सर्व मच्छिमारांना मासळीच न मिळाल्यामुळे प्रचंड दुष्काळ जाणवू लागला आहे.
मत्स्य हंगामाचा सुरवातीचा काळ पारंपारिक व गिलनेटधारक, ट्रॉलिंग मच्छिमारांसाठी महत्त्वाचा असतो. परंतु यंदाच्या मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासूनच वादळी हवामानामुळे छोट्या मोठ्या मच्छिमारांचे मासेमारीचे दिवस खूपच घटले असून मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या मालवणातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील मच्छिमारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मच्छिमारांना भेडसावणा-या मत्स्यदुष्काळाकडे शासनाने लक्ष दयावे. तसेच मत्स्यदुष्काळासाठी सानुग्रह अनुदान जाहीर करावे. अशी मागणी संस्थेमार्फत करीत आहोत. असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष जगदीश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी, सचिव सतेजा वायंगणकर, संचालक जीवन भगत, प्रवीण मेस्त, संतोष ढोके, पंकज सादये, तुषार आचरेकर, दिलीप पराडकर, रवींद्र चांदेरकर, अर्चना आचरेकर, मृणाली कोयंडे, अक्षय रेवंडकर आदी संस्था पदाधिकारी तसेच मच्छिमार उपस्थित होते.
मलपी हायस्पीड बोटिंचा धुमाकूळ
मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटि शेकडोच्या संख्येने दाखल होऊन मासळीची लूट करत आहेत. तसेच स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचेही नुकसान करत आहेत. याबाबत मत्स्य अधिकारी यांचे लक्ष वेधत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हायस्पीड गस्ती नौका लवकर दाखल करावी
मलपी येथील हायस्पीड बोटींवर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाकडे असणारी जुनी गस्ती नौका उपयोगी नाही. हायस्पीड गस्ती नौका लवकर दाखल करावी, अथवा पोलिसांची स्पीड गस्ती नौका तोपर्यंत वापरात आणावी. अशी मागणी अध्यक्ष जगदीश खराडे व उपस्थितानी केली. यावर मत्स्य अधिकारी यांनी जुनी गस्ती नौका उपलब्ध झाल्याचे सांगितले. तसेच हायस्पीड गस्ती नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकर दाखल व्हावी यासाठी कार्यवाही सुरु असून पुढील महिन्यात हायस्पीड गस्ती नौका दाखल होईल असे उपस्थितांना सांगितले.










