विशाल परब यांच्या माध्यमातून उद्या ६ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत व लोकांच्या हिताची असावी या दृष्टीने पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सहा रुग्णवाहिका सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उद्या गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी केशवसुत कट्या नजीक श्रीमंत शिवराम राजे भोसले पुतळ्याजवळ होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आरोग्य सेवेच्या दृष्टीने आम्ही टाकलेले हे छोटेसे पाऊल असून यापुढे शिक्षण रोजगार आणि गावांच्या विकासात्मक कायापालट करण्याच्या दृष्टीने आमचे सातत्याने प्रयत्न राहणार आहेत अशी माहिती यावेळी विशाल परब यांनी दिली.

सह्याद्री पट्ट्यातील आंबोली चौकुळ गेले देवसु दाणोली पारपोली सातोळी बावळाट माडखोल धवडकी कलंबिस्त शिरशिंगे सांगेली कारिवडे कोलगाव आंबेगाव कुणकेरी या भागातील जनतेसाठी माडखोल भागात मोफत रुग्णवाहिका ठेवली जाणार आहे. तर बांदा दशक्रोशीतील इन्सुली मडुरा वाफोली विलवडे सरंबळ चराठा माजगाव या सर्व भागातील गावांसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मळगाव मळेवाड आजगाव शिरोडा या भागातील गावांना ग्रामीण रुग्णालय जोडणाऱ्या भागात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाप्रमाणेच सावंतवाडी शहर दोडामार्ग व वेंगुर्ले शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्व रुग्णवाहिका शासकीय रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न असणार आहेत. त्यामुळे यापुढे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रुग्णवाहिका उपलब्ध नाही असे होणार नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.