सावंतवाडी । प्रतिनिधी : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील मियां साहेब समाधी येथे मुख्यमार्गावर अचानक एकाने गाडी वळविल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार
कोलगाव येथील दांपत्य जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात निकिता जयवंत कुडतरकर राहणार कोलगाव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोलगाव येथील कुडतरकर दांपत्य सावंतवाडी येत होते. यावेळी मियां साहेब समाधी जवळ रस्त्याच्या बाजूला बसलेल्या मच्छी विक्रेत्यांकडून एका दुचाकी स्वाराने अचानकपणे गाडी वळविल्यामुळे त्याच्या गाडीची कुरतरकर यांच्या गाडीला धडक बसली. या अपघातात ते जखमी झाले. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर त्यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे. सदर महिलेच्या डोक्याला गंभीरजोखापत झाली असल्याने तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.











