“बॅंकेच्या ATM समोरून उठ नाहीतर…”
सिक्युरिटी गार्डने झोपलेल्या माणसावर घातला दगड
रत्नागिरीच्या राम आळीतील भीषण घटनेने शहर हादरले
रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी परिसरात आज रविवारच्या सकाळी थरारक घटना घडली. एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भर वस्तीत रक्ताचा सडा पाहायला मिळाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० ते ९:३० च्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगेश यशवंतराव भारती (रा. तोणदे) हे जनता बँकेच्या एटीएम समोर झोपले होते. सिक्युरिटी कंपनीच्या अंतर्गत तेथील एका बँकेच्या सिक्युरिटीसाठी कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याने मंगेश यांना तेथून उठण्यास सांगितले. मात्र, मंगेश तिथून हलत नसल्याच्या रागातून स्वप्निल पाटील याने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला.
हा हल्ला इतका भीषण होता की राम आळीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. राम आळी हा परिसर रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. येथे पहाटेपासूनच वर्दळ असते. मात्र आज रविवार असल्याने येथे शांतता होती.
या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि मुख्य बाजारपेठेतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमी मंगेश भारती यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या कारवाईत केदार वायचळ (सहाय्यक पोलीस निरीक्षक), सागर वाळुंजकर (पोलीस उप निरीक्षक), भगवान पाटील (पोलीस उप निरीक्षक), वैभव नार्वेकर व राकेश बागुल (पोलीस हवालदार) हे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करून
संशयित सुरक्षा रक्षक स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.













