असा आमदार लाभणे कुडाळ – मालवणच्या जनतेचे दुर्दैव

 

वैभव नाईकांचे १० कोटीचे आरोप हास्यास्पद

भाजपा नेते निलेश राणे यांची प्रतिक्रिया

सलग १० ते १५ वर्षे जिल्हा प्रशासनात राहिलेला वरिष्ठ अधिकारी दाखवा

मालवण | प्रतिनिधी : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांना दरमहा 10 कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. मात्र या आरोपांची भाजपा नेते निलेश राणे यांनी चिरफाड केली आहे. वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार राणेसाहेबांपासून ते केसरकर साहेब, उदय सामंत यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ दहा ते पंधरा वर्षांचा आहे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन ते फार तर चार वर्षांनी होतात. मग एवढी वर्ष जिल्हा परिषद प्रशासनात असलेला वरिष्ठ अधिकारी कोण ते दाखवा, असे सांगून केवळ सवंग प्रसिद्धीसाठी वैभव नाईक असले आरोप करत असून त्यांना स्वतःला जर आरोप करता येत नसतील तर त्यांनी कोणातरी जाणकाराकडून आरोप लिहून घ्यावेत, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावावर वैभव नाईक यांनी हे आरोप करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. मात्र हे आरोप कसे चुकीचे आहेत, हे निलेश राणे यांनी दाखवून दिले आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, वैभव नाईक ही अपरिपक्व व्यक्ती आहे. कोणत्याही अधिकाऱ्याचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा असतो. त्याला फार तर एक वर्षाची मुदत वाढ मिळू शकते. वैभव नाईक यांच्या आरोपाप्रमाणे राणेसाहेब, केसरकर साहेब, उदय सामंत यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांचा आहे. 10 ते 15 वर्षांपासून प्रमुख पदावर आहे असा अधिकारी जिल्ह्यात आहे का ? असा सवाल करून एवढा कार्यकाळ बघितला असा एकही अधिकारी जिल्ह्यात नाही. वैभव नाईक यांना आरोप करता देखील येत नाही. दुर्दैवाने कुडाळ मालवणला असा आमदार भेटला आहे. त्यांच्या आरोपांना हात पाय नसतात. त्यांनी ज्यांना आरोप कळतात अशा कोणाकडून तरी आरोप लिहून घ्यावेत, असा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे.

… त्यावेळी वैभव नाईकांना मातोश्रीचे दरवाजे कायमस्वरूपी बंद होतील

अनिकेत पटवर्धन असोत किंवा कुठलाही अधिकारी असोत ते सॉफ्ट टार्गेट असतात. अनिकेत पटवर्धन यांनी कितीवेळा वैभव नाईकांची रवींद्र चव्हाण यांच्या सोबत भेट घालून दिली आहे, किंवा वैभव नाईक यांनी अनिकेत पटवर्धन यांना कितीवेळा फोन लावून चव्हाण साहेबांची भेट मागितली, यावर जेव्हा अनिकेत पटवर्धन बोलतील, त्या दिवशी वैभव नाईकांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायमस्वरूपी बंद होतील. म्हणून वैभव नाईक यांनी बोलताना भान ठेवावे. आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय, ते पहावे. कुठल्याही मंत्र्यांचा पीए आणि अधिकारी मीडिया समोर येऊन सातत्याने बोलत नाहीत, म्हणून ते सॉफ्ट टार्गेट होतात. रवींद्र चव्हाण साहेबांवर थेट आरोप करायची हिंमत नाही, यासाठी सॉफ्ट टार्गेट शोधायचा, म्हणून अनिकेत पटवर्धनच नाव पुढे करायचं. या पलीकडे वैभव नाईक यांच्या आरोपात तथ्य काल नव्हतं, ना दहा वर्षांच्या आरोपात होतं आणि भविष्यात देखील नसणार आहे. म्हणून अशा व्यक्तीने अभ्यास करून किंवा कोणाकडून तरी आरोप लिहून घ्यावेत, आरोप कसे करावेत,हे शिकून घ्यावेत. तरच तो विरोधी पक्षातला नेता होऊ शकतो. पण त्यातील एकही क्वालिटी वैभव नाईक यांच्यात नाही. म्हणूनच ते आज कुठेच नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रिपदाचा यादीत साधं राज्यमंत्री म्हणून पण यांचं नाव नव्हतं. यावरूनच त्यांची उंची कळते. असेच फालतू आरोप करत राहिल्या मुळेच त्यांची उंची मर्यादित राहिली. ते तळ्यातच राहिले. म्हणून त्यांच्याकडून वेगळी काही अपेक्षा नाही, असे निलेश राणे म्हणाले.