शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

णजी: सेंट फ्रान्सिस झेवियर शवाची ‘डीएनए’ टेस्ट करावी, अशी मागणी केल्याबद्दल बुधवारी (०२ ऑक्टोबर) जुने गोवे पोलिस ठाण्यात सांकवाळ आंदोलनात गुंतलेल्या एका विशिष्ट गटाने तक्रार केली.

त्यानंतर आज, गुरुवारी (०३ ऑक्टोबर) हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसह जुने गोवे पोलिसांत तक्रार दिली आहे.

घटनेच्या चौकटीत मी मागणी केलेली असताना बुधवारी ‘त्या’ विशिष्ट गटाने आपली व्यक्तिगत बदनामी व चारित्र्यहनन केले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात वेलिंगकर म्हणतात- डीएनए टेस्टची मागणी तर जुनीच आहे; शिवाय ‘सेंट’ म्हणून चर्चची मान्यता मिळालेल्या व्यक्तींच्या अवशेषांची अशी चाचणी करून देण्याची चर्चची परंपरा आहे.४०० वर्षांपूर्वी जिवे मारली गेलेली जॉर्जियाची राणी केटेवन हिच्या अवशेषांचा शोध जुने गोवे येथेच ऑगस्टीन टॉवर भूमीत सरकार व चर्चच्या रीतसर परवानगीने उत्खनन करून घेतला गेला. चर्चच्या संमतीने त्या राणीच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून ते अवशेष राणीचेच होते हे सिद्ध झाल्यावर १० जुलै २०२१ रोजी भारत सरकारने सन्मानपूर्वक ते जॉर्जिया सरकारच्या स्वाधीन केले.

या राणीला ‘सेंट’ पद देण्यात आले होते. एका ‘सेंट’ला एक न्याय आणि दुसऱ्या ‘सेंट’च्या बाबतीत मात्र ‘जातीय सलोखा’ कसा व का बिघडतो ? संशयाचा सोक्षमोक्ष लावावा, असे चर्चला वाटू नये का? अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने एकदा हे शव झेवियरचे आहे हे सिद्ध व्हायला का नको ? एवढे खवळण्याचे कारण काय ? भविष्यात पुन्हा असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मागणी करणे गैर ठरत नाही, असेही अखेरीस वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

नाराजी व्यक्त

प्रा. वेलिंकर यांच्या वक्तव्यानंतर अनेक भागांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही राजकीय नेत्यांनी उघड विरोधी भूमिका घेतली आहे.