इको कारमधून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांची कारवाई 

 

 

इको कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

लांजा (प्रतिनिधी) इको कारमधून विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांनी कारवाई करताना कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता देवधे फाटा येथे करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधून गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे लांजा पोलिसांनी देवधे मार्गावर सायंकाळी कारवाई केली. सायंकाळी ७.१५ च्या सुमारास जाणारी इको कार क्रमांक एम एच ०१ एव्ही- ६३४९ थांबवली असता या कारमध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा आढळून आला.

विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची कारमधून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारमधील गौरव नंदकुमार चव्हाण (वय ३७ राहणार मिरजोळे जांभूळफाटा तालुका रत्नागिरी) तसेच शिवजित सुनील पाटील (राहणार मिरजोळे पाटील वाडी) आणि बाळकृष्ण वामनसे (राहणार झापडे तालुका लांजा) या तिघांना ताब्यात घेतले.त्याचप्रमाणे या घटनेत वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको कार (किंमत २ लाख ३० हजार) आणि गावठी हातभट्टीची दारू (वीस लिटर मापाची पांढऱ्या रंगाची 10 प्लॅस्टिक कॅन) अशी २०० लिटर गावठी हातभट्टीची दारू (किंमत २० हजार २५० रुपये) असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या घटनेत जप्त केला आहे .

विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकी प्रकरणी पोलिसांनी या तिघाही जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ) (ई) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.