वकिलवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर- ॲड.संग्राम देसाई

 

राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांचा सत्कार

राजापूर (प्रतिनिधी): आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपल्याला बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा असोशिएशनच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात या पदाच्या माध्यमातुन महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व वकिलवर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी राजापुरात दिली.

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा असोशिएशनचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रथमच कोकणाला हे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या निवडीनंतर ॲड. देसाई प्रथमच रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचा राजापूरात राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राजापूर तालुका बार असोशिएशनच्या कार्यालयात झालेल्या या सन्मान सोहळयाप्रसंगी राजापूरचे दिवाणी न्यायाधिश सुरज नलावडे, राजापूर तालुका बार असोशिएनशनचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश रानडे आदींसह बार असोशिएशनचे पदाधिकारी व वकिलवर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाची प्रतिमा भेट देऊन ॲड. संग्राम देसाई यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ॲड. देसाई यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हाती घेतलेल्या कामांबाबत सांगतानाच पनवेल येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या बार कौन्सीलच्या रिसर्च सेंटरच्या कामाची माहिती दिली. तसेच कोल्हापूर खंडपिठाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल असे नमुद केले. तर नव्याने वकिली व्यवसायात येणाऱ्या वकिल वर्गाबरोबरच ज्येष्ठ वकिलांच्या प्रश्नांनाही आपण न्याय देऊ अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधिश सुरज नलावडे  यांनी ॲड. संग्राम देसाई यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कामाचे कौतुक करत एड. देसाई यांच्याकडे असलेला संयम आणि काम करण्याची धडपड यामुळे ते या पदाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश रानडे, ॲड. सौ. स्वाती वालावलकर, ॲड. मिलिंद चव्हाण, ॲड. यशवंत कावतकर यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी देसाई यांच्या कार्याचे कौतुक करत वकिलवर्गांचे प्रश्न ते नक्कीच मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. सुशांत पवार यांनी केले. तसेच अधिवक्ता परिषदेचे तालुका अध्यक्ष ॲड चंद्रशेखर अभ्यंकर यांनी देखील ऍड संग्राम देसाई यांना याप्रसंगी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजापूर तालुका बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व वकिलवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.