महामार्गावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास ऐनकेन कारणांनी चर्चेचा विषय ठरला आहे. महामार्गाचे रखडलेले काम जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांचा त्रास
कायम असताना त्यात आता धुळीच्या साम्राज्याची नवी भर पडली आहे.
धुळीमुळे विशेषतः दुचाकीस्वारांची तारेवरची कसरत सुरू आहे. धुळीमुळे बऱ्याचवेळा वाहने अचानक रस्त्यातच थांबत असल्याने प्रसंगी अपघात देखील घडत आहेत. .. ठेकाधारक कंपनीकडून कोणत्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले  आहेत.
महामार्गावर प्रवास  करताना पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांतून मार्गक्रमण वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे
वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले होते. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा फटका बसत होता. पावसाने उघडिप घेतल्याने हा मनस्ताप काहीअंशी थांबला आहे. उन्हामुळे महामार्गावर आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीच्या त्रासाने वाहनचालकांना वाहने हाकताना जीव मुठीत
धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना त्रास होत असून श्वसनाचे आजार जडत आहेत. धुळीच्या साम्राज्याचा त्रास कमी करण्यासाठी ठेकाधारक कंपनीने ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची मागणी केली जात आहे.