हिंदू समाजातील नागरिकांच्या ठिय्या आंदोलनानंतर चौघे तत्काळ अटक
कोकण नगर येथे घुसलेल्या 40 जणांवरही गुन्हा दाखल
रत्नागिरी | प्रतिनिधी : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या पथसंचलनात घुसून मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मध्यरात्री उमटली. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत हिंदू समाजाकडून करण्यात आली. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शनिवारी पहाटे चौघांना अटक करण्यात आली. तर 140 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विजयादशमीच्या संचलनात घोषणाबाजी करून हे संचलन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम समाजाच्या मुसा काझी यांच्यासह 100 जणांविरूद्ध तर हिंदू समाजाच्या सुमारे 30 ते 40 जणांविरूद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या कोकणनगर येथे राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कोकणनगर नजिकच्या कदमवाडी नं.1 मधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सुरू होणार होते. तत्पूव काही मीटर आत असलेल्या गार्डनच्या आवारात संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथून ते मुख्य मार्गावर येणार होते. त्याचवेळी मुस्लीम समाजाचा जमाव पथसंचलनाजवळ आला. त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या आणि संचलन रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक समोर असतानाही हा प्रकार घडला. त्यांनतर पोलिसांनी या घोषणा करणाऱ्यांना रोखल्याने पथसंचलन रत्नागिरी शहराच्या दिशेने रवाना झाले.
पथसंचलन संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात एकत्र आले. माजी आमदार बाळासाहेब माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांनी संचलनात घुसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार देण्याची सूचना केली. वरूण सुंदरशाम पंडित यांनी शहर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह 100 जणांवर न्यायसंहिता 189 (1), 185(2), 191(1), 192, 195, 196, 57, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 57/137 नुसार गुन्हा दाखल केला.
मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यावेळी उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस स्थानकातून थेट कोकणनगरकडे धाव घेतली. दरम्यान, चर्मालय येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमाव थेट मुस्लीम मोहल्ल्यात घुसला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. उपस्थित पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यावेळी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
सायंकाळी 6 वाजल्या-पासून सकाळी 6 वाजेपर्यंत दोन्ही बाजुकडून ॲक्शन-रिॲक्शन येत राहिल्याने 12 तास तणाव कायम होता. पोलीस हवालदार उमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे 30 ते 40 जणांविरूद्ध बेकायदा जमाव करून मुस्लीम मोहल्ल्यात घुसून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी न्यायसंहिता 189(2), 190, 191(2), 196, 118(1), 57 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मध्यरात्री घटनास्थळी पोलिसांनी चित्रिकरण केले होते. त्याआधारे उर्वरित आरोपींचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. गुन्ह्यातील काहींना नोटीसची बजावणी करण्यात आली आहे. तर कोकणनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.









