जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मडुरा हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड

 

बांदा : प्रतिनिधी : सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मडुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बांदा येथे पार पडलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात थाळीफेक क्रीडा प्रकारात प्रशालेची उर्वशी विजय शेर्लेकर प्रथम क्रमांक, गोळा फेक क्रीडा प्रकारात क्लेरीचा ज्युलियस रोडरिक्स प्रथम क्रमांक तर १७ वर्षे वयोगटाखालील १०० मीटर धावणे स्पर्धेत अपूर्वा एकनाथ सावळ हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या तीनही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा विभागातील या यशामुळे मडुरा हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव, सर्व कार्यकारीणी सदस्य, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.