बिबवणे गावाचा पहिला चार्टर्ड अकाउंटंट – ओंकार सामंत याचे अभिमानास्पद यश

बिबवणे (प्रतिनिधी): बिबवणे गांवातील तसेच बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मीनारायण विद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार संतोष सामंत (डिंगे) याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक व्यावसायिक परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून गावातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळवला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. वित्त, लेखांकन, करप्रणाली आणि लेखापरीक्षण या क्षेत्रात सीए पदवीधरांचे योगदान अत्यंत मोलाचे असते. या यशासाठी ओंकारने सातत्यपूर्ण अभ्यास, प्रखर इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर हे ध्येय साध्य केले.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बिबवणे ग्रामपंचायत, सरपंच सौ. सृष्टी कुडपकर तसेच सर्व ग्रामस्थांकडून त्याचे आणि सामंत कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

लक्ष्मीनारायण विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गानेही ओंकारच्या यशाचा गौरव केला. विद्यालयाच्या भूतपूर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गावाचा आणि विद्यालयाचा मान उंचावणाऱ्या ओंकारला उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छापर संदेशांचा वर्षाव होत आहे.