मालवण | प्रतिनिधी : वैभव नाईकांचे खास कंत्राटदार कमी फायद्याची काम घेत नाहीत. कारण कमी फायद्याच्या कामातून सुद्धा त्यांना वैभव नाईकांना दलाली द्यावी लागते, आणि कंत्राटदारांना ते काम तोट्यात पडते. त्यामुळे कोणीच कंत्राटदार अशी कामे घेत नसल्यामुळे कमी फायदा असलेली विकास कामे प्रलंबित राहतात व जनतेची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून इतर कंत्राटदारांशी बोलून अशा अनेक प्रलंबित कामांना स्वीकारण्याची सूचना केली व आर्थिक नुकसान झाल्यास त्या आर्थिक नुकसानाची भरपाई स्व:खर्चाने करण्याचा शब्द दिला जेणेकरून विकास कामे उत्तम दर्जाची होतील आणि जनतेचे प्रश्न सुटतील. असे सांगत भाजपा नेते निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या कारभारावर तोफ डागली.
दरम्यान निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या यापैकी काही विकासकामाचे भूमिपूजन पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मालवण तालुक्यातील पाणलोस व डांगमोडे येथे निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. रखडलेली रस्ते विकासकामे मंजूर झाल्याबाबत ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानले.
अनेक वर्षे आम्ही खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहोत. मात्र समस्या सुटत नव्हत्या. मात्र आपण आमचा प्रश्न सोडवलात. आमची रस्त्याची मागणी पुर्ण केलात. अश्या भावना व्यक्त करताना ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानले.












