महानाट्यासाठी अश्वाची केली खरेदी ; कृष्ण नामकरण
निर्माते भूषण साटम यांची पत्रकार परिषदेत माहिती
मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास व कवी भूषण यांची गाथा मांडणाऱ्या शिवराज भूषण या महानाट्याच्या पहिल्या चार प्रयोगाला रसिकांचा मिळालेल्या हाऊसफुल्लच्या आशीर्वादानंतर आता या महानाट्याने डिसेंबर महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण होणार आहे. सिंधुदुर्ग पाठोपाठ जानेवारी महिन्यात या महानाट्याचे तीन प्रयोग होतील. अशी माहिती श्री शिवराज मंच मालवणचे प्रमुख व शिवराज भूषण या महानाट्याचे निर्माते श्री. भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवराज्याभिषेक वर्धापन दिनी मालवणात चार प्रयोगाद्वारे सादर केले गेले. या महानाट्याला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर एक नवी उमेद घेऊन मालवणचा शिवराज मंच आता हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या महानाट्याचे चार प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबईमध्ये तीन प्रयोग आणि पश्चिम महाराष्ट्रसह गोव्यातही प्रयोग सादर केले जाणार असल्याची माहिती श्री शिवराज मंच मालवणचे प्रमुख व महानाट्याचे निर्माते श्री. भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून दिनी मालवणात शिवराज मंचच्या वतीने शिवराज भूषण या महानाट्याचे चार प्रयोग सादर झाले होते. या महानाट्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद देत हाऊसफुलचा बोर्ड लावला. या महानाट्याला मिळालेला प्रतिसाद पाहून हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा निश्चय भूषण साटम आणि त्यातील कलाकारांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नाट्याचे निर्माते भूषण साटम यांनी सादर झालेल्या महानाट्यात शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या प्रसंगांची आणखी भर घालून तसेच छत्रपतींच्या अश्वाचा ( घोडा) अधिकतम वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करून व्यावसायिक रंगभूमीवर दणक्यात पदार्पण करण्याचे ठरविले. यासाठी शिवराज मंचने महानाट्यासाठी एक अश्व खरेदी केला. त्याचा नामकारण सोहळा काल चौके येथील हॉटेल रापण गलबत मध्ये शिवराज भूषण महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, संतोष गावडे, अमित खोत, कृष्णा ढोलम, कुणाल मांजरेकर, आपा मालंडकर
कलाकार भाऊ सामंत, सौ. शुभदा टिकम, सौ. पूजा सरकारे, गजानन मांजरेकर, किशोर सरनोबत आदी व इतरांच्या उपस्थितीत पार पडला या अश्वाचे नाव” कृष्णा ” असे ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि कवी भूषण यांच्यावरील शिवराज भूषण हे महानाट्य डिसेंबर महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. पहिल्या टप्प्यात या महानाट्याचे चार प्रयोग झाले. आता दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गात कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि कणकवली याठिकाणी हे महानाट्य सादर होईल, तर तिसऱ्या टप्प्यात हे महानाट्य मुंबईच्या दिशेने कूच करेल. शिवाजी नाट्य मंदिर – दादर, गडकरी रंगायतन- ठाणे, विश्वनाथ भावे नाट्यगृह, वाशी, या तीन ठिकाणी हे महानाट्य सादर केले जाईल. सिंधुदुर्ग विशेषत: मालवणमधील हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या ६० स्थानिक कलाकारांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य सर्वांसाठी अभिमानास्पद आणि भूषणावह गोष्ट आहे. हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यामागे कोणताही आर्थिक हिताचा किंवा फायद्याचा विचार न करता केवळ महाराजांचे विचार जनमाणसात पोहचावे हा एकच उद्देश समोर ठेवून शिवराज भूषण हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर आणत आहोत, असे श्री. साटम म्हणाले.
शिवराज मंचने या महानाट्यासाठी खास अश्व खरेदी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आठ अश्व होते, त्यापैकी राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी जो अश्व वापरला होता, त्या अश्वाचे नाव कृष्णा होते. हेच नाव आम्ही अकलूज येथून अश्वबाजारातून खरेदी केलेल्या घोड्याला ठेवले आहे. या नाटकात शिवाजी महाराज यांच्या घटनांचे सादरीकरण करताना रंगमंचावर अश्वाचा मनमोकळेपणाने वावर व्हावा आणि या महानाट्याची परिणामकता साधली जावी हाच यामागे उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. आमच्याबरोबर इतरांनीही अश्व खरेदी करून घोडेस्वारीची टूर पर्यटकांसाठी आयोजित करावी हा देखील आमचा उद्देश आहे. एकूणच डिसेंबर महिन्यापासून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शिवराज भूषण या महानाट्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास भूषण साटम व दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे.












