जिल्हा शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग संघटनेची शासनाकडे मागणी
वेंगुर्ले : दाजी नाईक : गेले ७ ते ८ दिवस सततच्या पडणा-या परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या भातपिकाचे नुकसान होऊन शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा व नुकसान भरपाईचा ही विचार करावा, अशी मागणी जिल्हा शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने आज वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सद्या भातपीक कापणी योग्य झालेले होते. परंतु गेले ७ ते ८ दिवस सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे काही पिकांनी भात (धान) ला खुटवा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरी शासनाने विमा कवच आधार म्हणून दिलेले असले तरी कोणतेही निकष न लावता शेतक- यांचे भात पिकांचे सरसकट पंचनामे करावे. व सरसकट कर्जमाफी चा विचार करावा. चालू वर्षांत भातपिक चांगल्या स्वरुपात असताना सुधा ऐन कापणी च्या तोंडावर हे नुकसान होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
मुळातच शेतकरी कर्ज बाजारी पणामुळे अडचणीत असून शेतक-यांनी मशागत करण्याकरीता सहकार सोसायटी मधून कर्ज घेवून व ओढाताण करुन भात शेती केली. त्याचे नुकसान होत असेल तर शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अजून तरी हवामानाच्या अंदाजानुसार ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. अशाच प्रकारे जर सतत पाऊस पडल्यास शेतक-यांना संकटाला सामोरे जावे लागेल. याकरीता शासनाकडे आचार संहिता लागू असली तरी सर्वसामान्य तळागळातील शेतक-यांचा गांभिर्याने विचार करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शामसुंदर राय, प्रीतम सावंत, अर्जुन नाईक, सुयोग नाईक, राजेश बेहेरे, संदीप देसाई या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व वेंगुर्ले तहसीलदार यांना हे निवेदन दिले आहे. या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.











