वेंगुर्ले : (दाजी नाईक) – महाराष्ट्रातील प्रसिद्ध रांगोळीसम्राट [Rangoli Samrat] आणि वेंगुर्ले-कलानगर येथील मूळ रहिवासी गुणवंत गंगाराम मांजरेकर यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे गुरुवारी, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि दोन नाती असा परिवार आहे.
गुणवंत मांजरेकर यांचे लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्यात [Vengurla] घेतल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी त्यांच्या काका कृष्णराव मांजरेकर यांनी त्यांना मुंबईला नेले. तेथे त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट [J.J. School of Art] मध्ये उच्च शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम [Hindustan Petroleum] मध्ये नोकरी पत्करली.
बालपण अत्यंत गरीबीत गेलेल्या गुणवंत मांजरेकर यांनी कोळश्याची पूड आणि दारातील समुद्राच्या वाळूने रांगोळी रेखाटण्यास सुरुवात केली. रांगोळी काढण्याचा त्यांचा हातखंडा होता, आणि त्यांनी कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक रांगोळी प्रदर्शनं भरवली. फकरुदीन अली अहमद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, फारुख अब्दुला, एन. टी. रामराव, यशवंतराव चव्हाण यांसारख्या विभूतींनी त्यांच्या रांगोळी प्रदर्शनांचे उद्घाटन केले होते.
मांजरेकरांनी राजकारण, जागतिक संबंध, क्रिकेट, भारतीय व परदेशी प्रसिद्ध व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध विषयांवर रांगोळ्या रेखाटल्या. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे [Acharya Pralhad Keshav Atre] यांनी त्यांना ‘रांगोळी सम्राट’ ही पदवी दिली होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले व त्यांचे रांगोळीचे कौशल्य पुढील पिढ्यांना हस्तांतरित केले.












