विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा संबंध नाही : प्रभाकर सावंत

 

अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी

भाजपच्या नेत्यांची नाव घेण्याचा अधिकार नाही

सावंतवाडी । प्रतिनिधी : अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी असणारे विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे काल संध्याकाळी निदर्शनास आले. भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दाखल करू नका अशा सुचना दिल्या होत्या‌. भाजपात जो संघटनेचा आदेश मानतो व थांबतो त्याला चांगल भविष्य असतं. अजूनही चार दिवस आहेत. त्यांनी योग्य विचार करावा मात्र त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास भाजप व भाजप नेत्यांच नाव घेण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

भाजप ही त्यागाची पार्टी आहे‌. ज्या देवेंद्र फडणवीस यांच नाव त्यांनी घेतलं त्यांनी देखील पक्षाच्या हितासाठी मोठा त्याग केला आहे‌. त्यामुळे त्यांचं नाव घेण्याचा कोणताही अधिकार विशाल परब यांना नाही. त्यांनी त्वरित उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अन्यथा पक्षाच्या ध्येय धोरणाला बाधा आणणारी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निश्चितच हकालपट्टीची कारवाई होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.