महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राजकारण कसे आणि किती ढवळून निघाले आहे, हे उभा महाराष्ट्र पहात आहे. सर्वांचे अंदाज चुकवणार असे राजकारण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. निवडून येणे हा निकष असलेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय रामदास आठवले, रासप अशी महायुती असून, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी लढत आहे. महाराष्ट्रात कोकणातील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तसेच तिसरी आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे.
आता आणखी चार दिवसांनी, ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लढती कशा होणार, कोण उमेदवारी अर्ज ठेवणार आणि कोण माघार घेणार, हे स्पष्ट होईल. होत असलेल्या या राजकीय ध्रुवीकरणामध्ये पक्षांचे आणि विचारांचे अस्तित्व निश्चित होणार आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा जो डंका तथाकथित मंडळींकडून सतत वाजवला जातो, त्याला लक्षात घेतल्यास डावी आणि उजवी विचारसरणी यामध्ये ही वैचारिक राजकीय लढाई होणार आहे.
महाविकास आघाडीत गेल्या आठवड्यात जागा वाटपाचा तिढा सुटला, म्हणून जाहीर करण्यात आले की ८५-८५-८५ नंतर ९०-९०-९० फॉर्म्युला ठरला आहे. परंतु, यातला कुठलाही फॉर्म्युला ठरला नव्हता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने महाविकास आघाडी किती घट्ट आहे, हे सांगत असतात. परंतु, त्यात हा जोड घट्ट नव्हता, हे पुढच्या एक दिवसातच जनतेसमोर आले.
राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या उद्धव ठाकरे शिवसेना काहीही नसतानाही काँग्रेसमुळे त्यांना फायदा होणार असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:च्या निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी फार चर्चा न करता अत्यंत धुर्त खेळी करत स्वत:च्या पक्षाचे उमेदवार पद्धतशीरपणे निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याशी चर्चा करत असताना, समाजवादी पक्षाचा उमेदवार फहाद अहमद आपल्याकडे घेत त्यांची उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे शिवसेनेची वाट न पहाता आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीमध्ये परस्परातील अविश्वासाची दरी वाढवली आहे.
कोकणात तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या निवडणुकीत महाविकास आघाडीतून पूर्णपणे नामशेष झाला आहे. कोकणातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि त्यांना पक्षकामाची उर्जा वाढेल, अशी कोणतीही स्थिती नसल्याने, कार्यकर्ते फक्त पालखीचे भोई बनून राहायचे काय, या प्रश्नार्थक चेहऱ्याने वावरताना दिसत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना पद्धतशीरपणे नियोजन करून केव्हाचेच चेकमेट केले आहे. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांसोबतच बनवाबनवीचा फार मोठा खेळ खेळण्यात आले आहे.
महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढतीचा फॉर्म्युला अमलात आणला जात असताना, महायुतीकडून युतीचे मित्रपक्ष असलेल्यांनाही जागा वाटप करण्यात आले आहे. बडनेरमध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रासप-रत्नागर गुट्टे, कलिना मतदारसंघात आरपीआय आठवलेगट पाठींबा, तर शाहूवाडीत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
यामुळे महायुतीतील मित्रपक्षाशी मैत्रीधर्म भारतीय जनता पक्षाने पाळला आहे. उर्वरित महाराष्ट्राप्रमाणेच कोकणचे राजकारणही पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त कोकण महायुतीच्या पूर्ण पाठीशी राहिले होते. विधानसभा निवडणुकीत यात कोणताही बदल घडताना दिसणार नाही, अशी स्थिती आहे.












