६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला
देवगड : प्रतिनिधी
शिरगाव धोपटेवाडी येथे बंद घर फोडून घरातील ग्रास कटर, हँड ग्रँडर आणि हॅमर डिलर मशीन अशी एकूण ६ हजार रुपयांची सामग्री चोरून नेल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी घरमालकांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष अशोक वाडये (रा. शिरगाव, वरची बाजारपेठ) हे २८ सप्टेंबर रोजी शिरगाव धोपटेवाडी येथील आपल्या घराला कुलूप लावून मुंबईला गेले होते. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईहून शिरगाव येथे परतल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते आपल्या चारचाकी वाहनासह धोपटेवाडी येथील घराकडे गेले.
तेव्हा त्यांनी पाहिले की, घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कोणत्यातरी हत्याराने उचकटून उघडले होते. घरात प्रवेश करून चोरट्यांनी ५ हजार रुपये किमतीचा ग्रास कटर, ५०० रुपये किमतीचा हँड ग्रँडर आणि ५०० रुपये किमतीची हॅमर डिलर मशीन अशी एकूण ६ हजार रुपयांची सामग्री चोरून नेली.
या घटनेबाबत संतोष वाडये यांनी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, स.पो. उपनिरीक्षक राजन जाधव आणि पो.हे.कॉ. महेंद्र महाडिक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.