रत्नागिरी ः प्रतिनिधी : रस्त्यात उभे राहिल्यामुळे आपली दुचाकी घसरल्याचा समज करुन एकाला दोघांनी हातांच्या ठोशांनी व दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वा. सुमारास राजीवडा येथे घडली.
शवाफ नजीर कोतवडेकर, जुमेर सउद वस्ता (दोन्ही रा.राजीवडा जामा मशिद जवळ,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात मोहम्मद जैनुद्दीन वस्ता (42,रा.राजिवडा,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री ते राजीवडा येथील रस्त्यावर पत्नीची वाट पहात उभे होते. त्यावेळी शवाफ कोतवडेकर आपल्या ताब्यातील दुचाकीवर जुमेर वस्ताला पाठीमागे बसवून त्या रस्त्याने जात असताना त्याची दुचाकी घसरली. मोहम्मद वस्ता हे रस्त्यात उभे असल्यामुळेच आपली दुचाकी घसरली असा गैरसमज करुन घेत संशयित दोघांनी फिर्यादीला हातांच्या ठोशांनी आणि दगडाने मारहाण केली. संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),115(2),352,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










