धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांचे स्पष्टीकरण
राजन तेलींकडून अपप्रचार होत असल्याचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव धाकोरा परिसरातील प्रस्तावित मायनिंग मागे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा हात असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेलींकडून करण्यात येत आहे. मात्र, ही माहिती पूर्णतः चुकीची असून ‘स्थानिकांना नको असलेला कोणताही प्रकल्प आपण कधीही होऊ देणार नाही, अशा शब्दांत मंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला आश्वासित केले असल्याचे धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांनी स्पष्ट केले असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या सोबत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
तासगाव धाकोरे परिसरात मायनिंग होणार अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही सर्व धाकोरा परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी व सर्वसामान्य शेतकऱ्यांनीही शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना भेटून आमचा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध असल्याबाबतचे निवेदन दिले होते. त्याच वेळी मंत्री केसरकर यांनी स्थानिकांचा विरोध असल्यास कोणताही प्रकल्प होणार नाही,असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे आता निवडणुकीत मते मिळविण्यासाठी लोकांचा बुद्धिभेद करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला येथील जनता फसणार नाही. धाकोरा परिसरातील सुज्ञ जनता सर्व जाणते. विकासाच्या अनुषंगाने आमचा पाठिंबा केसरकरांनाच असल्याचे धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांनी स्पष्ट केले.
तर राजन तेली यांनी धाकोरावासीयांना खोटे बोलून जी माहिती सांगितली त्या राजन तेली यांनी कळणे मायनिंग मध्ये तुमच्या मशिनरी भाड्याला ठेऊन किती बक्कळ पैसा कमावला याची धाकोरा ग्रामस्थांना माहिती आहे अशी टीकाही त्यांनी केली.
सरपंच सौ. स्नेहा मुळीक यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मी हे करेन, ते करेन”, असे सांगणारे फक्त आता येथील सुज्ञ जनतेला आश्वासने देत फिरत आहेत, हे साफ चुकीचे आहे. उलटपक्षी मंत्री दीपक केसरकर यांनी आजगाव आणि धाकोरा या गावांना निवेदनाद्वारे जी जी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. किंबहुना लाखो रुपयांची विकास कामे सुद्धा केली आहेत. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून येथील जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे राजन तेली यांनी कळणे मायनिंग मध्ये आपल्या मशीन देऊन किती बक्कळ पैसा कमावला याचे उत्तर द्यावे. उगाच धाकोरे वासियांना खोटी माहिती देऊ नये. तेली हे बांधकाम विभागाची कामे बाऊन्सर वापरून मॅनेज करतात याचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आम्ही पुरवू शकतो. विरोधकांना सोबत घेऊन राजन तेली हे केवळ आपली राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी आश्वासने देत असून आजपर्यंत त्यांनी आपल्या गावासाठी काय केले, येथील विकासासाठी किती निधी आणला, हे त्यांनी सांगावे. अन्यथा दीपक केसरकर यांनी केलेली आजपर्यंतची मदत आम्ही जनतेला सांगू तेही पुराव्यानिशी, असा टोलाही सौ.मुळीक यांनी लगावला आहे.












