खेड पोलिसांच्या तत्परतेने वृद्धेची बॅग परत

 

 

खेड (प्रतिनिधी) मुंबईतून एक वृद्ध महिला सोमवारी पेन्शनच्या कामासाठी दापोलीहून खेडकडे एसटी बसने येत असताना रोख रक्कम असलेली बॅग बसमध्येच विसरली. याबाबत वृद्ध महिलेने येथील पोलीस ठाण्यात कळवताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तप्तरता दाखवत बॅग तिच्याकडे सुपूर्द केली.

 

 

मुंबई येथे वास्तव्यात असलेली ही महिला पेन्शनच्या कामासाठी दापोलीत आली होती. तेथील कामे आटपून पुन्हा मुंबईला जाण्यासाठी दापोली- खेड बसमधून प्रवास करत होती. मात्र इच्छितस्थळी उतरल्यानंतर रोख रक्कम व अत्यावश्यक कागदपत्रे असलेली बॅग बसमध्येच राहिल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी तातडीने एसटी बस चालक जयसिंग शिंदे आणि वाहक सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनी बसची तपासणी केली असता सदर बॅग बसमध्ये आढळून आली. ती त्यांनी स्वतःहून खेड पोलीस ठाण्यात आणून दिली. त्यानंतर उपनिरीक्षक येवले, कॉन्स्टेबल पवार यांनी वृद्ध महिलेकडे सदर बॅग सुपूर्द केली. या प्रकरणी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.