मात्र व्यापारी, वाहनचालक, पर्यटक, आणि प्रवाशांमध्ये प्रचंड संताप
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : तब्बल १६ तासानंतर आरटीओ ऑफिसचे पोलीस कॉन्स्टेबल चोडणकर, साबळे, घाडी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन सायंकाळी साडेपाच वाजता फसलेली गाडी बाजूला काढून वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरळीत सुरू केली. चेक पोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक सुरू होताच ती सुरळीत राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. मात्र, वाहतूक सुरू होताच एका कंटेनरने बाजारपेठेत साईड घेताना लगतच्या लाईटच्या खांबाला धडक दिली, त्यामुळे पार्किंगच्या ठिकाणी पोल वाकला आणि वायरी तुटल्या. विद्युत प्रवाह बंद असल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र, लाईट गेल्याने सुमारे दीड-दोन तास वाहतूक खोळंबली होती.
मंगळवारी पहाटे दोन वाजता एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी 30 टन सिमेंटने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन जाताना पुनम हॉटेलच्या खालच्या वळणावर अंदाज चुकवल्याने तो एका खोल खड्ड्यात अडकला. या दुर्घटनेत ट्रकाचे टायर फुटून १४-चाकी ट्रकाचे पाटे आणि कमानी तुटल्या, ज्यामुळे ट्रक बंद पडला. परिणामी, खिंडीपासून लोरे रस्त्यापर्यंत आणि पाच झाडांपर्यंत चिरे भरलेले ट्रक, कंटेनर आणि अवजड वाहने दोन्ही बाजूंनी ठप्प झाली.
स्थानिक ग्रामपंचायत सदस्य पवन भालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यासह जेसीबीच्या सहाय्याने एका बाजूला जागा करून दिल्याने चार चाकी छोटी वाहने जाऊ लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरटीओ पोलीस, स्थानिक पोलीस आणि सेवाभावी ग्रामस्थांनी खोळंबलेल्या प्रवासी आणि चालकांसाठी पाण्याची व्यवस्था केली. मात्र, निकृष्ट कामामुळे उखडलेला रस्ता आणि पडलेले खड्डे यामुळे वाहनचालक, पर्यटक, प्रवासी, आणि ग्रामस्थांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.












