नितेश राणे विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा विश्वास

आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ फणसगाव येथे सभेत प्रतिपादन

आमदार नितेश राणे यांनी मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले खासदार नारायण राणे

तुमच्या भागाचा विकास हाच माझा ध्यास आमदार नितेश राणे

सर्वाधिक उपलब्ध असणारे आमदार म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे, आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मतदारसंघात आणला गेला आहे. हा निधी तेव्हाच येतो, जेव्हा आमदार अधिक सक्षम आणि सक्रिय असतो. मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान मला नितेश राणे यांच्या कामावर जनता खूश असल्याचे दिसून आले. आमदार नितेश राणे हे विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील, असे मत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

महायुतीचे उमेदवार, आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ फणसगाव येथे झालेल्या सभेमध्ये विनोद तावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या हॅट्रिक विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,पडेल मंडळाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, पडेल मंडळ प्रभारी डॉ. अमोल तेली यांसह अनेक भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार नारायण राणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम केले आहे. त्यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांचा विकास केला, ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून, वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आमदार नितेश राणे यांनी बोलताना या भागाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. या भागातील रस्ते दळणवळण याबाबत कटाक्षाने लक्ष दिले आहे. विजयदुर्ग कसार्डे हा रस्ता आता अद्यावत झाल्यावर या भागाचा आणखीन कायापालट होईल असे त्यांनी म्हटले. यावेळी भगवान कोकरे महाराज, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, यांनी आपले विचार व्यक्त केले. फणसगाव परिसरातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सभेला उपस्थिती दर्शवली होती.