केसरकरांनी आंबेडकरी चळवळीतील युवकांच्या अनेक मागण्या केल्या पूर्ण
दीपक केसरकर यांच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय संविधानात मूलभूत हक्क मांडले आहेत. देश एकसंघ असण्याचे कारण भारतीय संविधान आहे. काँग्रेस सरकारच्या काळात ७५ वर्षांत अनेक वेळा घटनादुरुस्ती काँग्रेसने केल्यात. त्यामुळे भाजपने तसं केलं तर संविधान बदलले असं होतं नाही. नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच वर्षी २६ व २७ नोव्हेंबरला संविधानावर अधिवेशन बोलवलं होत. संविधानावर प्रेम करणारे ते पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संविधान मंदीर संकल्पना सुरू आहे. महायुतीचे सर्वच नेते संविधानाला मानणारे असून त्यांनी नेहमीच संविधानाचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन विश्वशांती सामाजिक संस्था अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळ मुंबईचे युवा नेते प्रतीक कांबळे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना आंबेडकरी चळवळीतील तरूण कार्यकर्त्यांच्या असंख्य मागण्या पूर्ण केल्या. भरघोस निधी स्मारकांसाठी दिला. आंबेडकरी चळवळीतील प्रश्न त्यांनी मार्गी लावले. इथल्या आंबेडकरी जनतेत त्यांची ही प्रतिमा पोहचवत आहोत. गेले आठ दिवस या मतदारसंघात तळ ठोकून आहोत. त्यांचा विरोधक दिसून आला नाही. तेवढ्या ताकतीचा विरोधक नाही. त्यांच्यासाठी ही सोपी निवडणूक असून त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांची सभा ज्या ठिकाणी झाली तिथेच दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष असताना स्मारक उभारले होते. आज त्यांच्या रुपाने मंत्रीमंडळात आम्हाला एक आश्वासक चेहरा मिळाला. आमच्या संकल्पना प्रत्यक्षात उभारण्यासाठी भरघोस मदत केली असून भविष्यातही दीपक केसरकर निश्चितच मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ज्येष्ठ नेते राजाराम जाधव, नरेश सपकाळे सुनील डुबळे, शैलेश माने, राजेश माने, स्वप्निल चंदनशिवे आदी उपस्थित होते.











