खेड तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारच केले बंद!

 

आवारात अन्य वाहनांचे पार्किंग वाढल्याचा परिणाम, कामकाजासाठी येणाऱ्यांची गैरसोय

खेड(प्रतिनिधी) खेड तहसीलदार कार्यालय आवारात प्रशासकीय वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने पार्किंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी मार्गस्थ होणारी वाहने उभी करण्याचा प्रश्न जटील बनला आहे. यामुळे तहसीलदार कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून यावर उपाय शोधला आहे. मात्र दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांसमोर, वाहने उभी करायची तरी कुठे, असा प्रश्न उभा ठाकत आहे.

येथील तहसीलदार कार्यालयाचे आवार पार्किंगस्थळ बनले आहे. दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त येणाऱ्या अन्य वाहनचालकांची वाहने कार्यालयाच्या आवारात सर्रासपणे उभी केली जात आहेत. सध्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी वाहने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात येत असतात. मात्र आवार आधीच अन्य खासगी वाहनांनी ‘पॅक’ होत असल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्न प्रशासकीय यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे.

याचमुळे शासकीय वाहनांसह निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकरिता मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्याची वेळ तहसीलवर येवून ठेपली आहे. बऱ्याचवेळा याचा फटका शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे. दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रसंगी प्रवेशद्वारावरच वाहने उभी करावी लागत आहेत.