दुचाकीची रेलिंगला धडक बसून तरुण कोसळला २०० फूट खोल दरीत

आंबोली घाटातील घटना : रेस्क्यू टीमने दिले जिवदान

आंबोली । प्रतिनिधी : सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने येत असताना दुचाकीची रस्त्यालगतच्या रेलिंगला धडक बसून दुचाकी वरील मागे बसलेला तरुण चक्क २०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात आज घडली.सुदैवाने त्या ठिकाणी झाडेझुडपे असल्यामुळे तो बचावला त्याच्या डोक्याला हाताला व पायांना थोडेफार दुखापत झाले ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली याबाबतची खबर त्याच्यासोबत मोटरसायकल चालवत असलेला सय्यद मकानदार (वय २४ ) याने आंबोली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या सहकार्याने त्याला दरीतून वर काढत जीवदान दिले.

 

हुसेन मकानदार ( वय १५ , रा. हुकेरी कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे.
आंबोली घाटातील मुख्य धबधबा पासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर दूचाकीवरील ताबा सुटल्याने
दूचाकीची धडक संरक्षक कठड्याला बसल्यामुळे दूचाकीच्या मागे बसलेला पंधरा वर्षीय तरुण हा जवळपास दोनशे फूट खोल दरीमध्ये फेकला गेला. मात्र, झाडाझुडपात अडकल्याने त्याचा जीव वाचला.

 

 

याबाबतची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी तात्काळ आंबोली येथील रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर हेमंत नार्वेकर अजित नार्वेकर यांना खबर दिली. रेस्क्यू टीमने तात्काळ त्या ठिकाणी आपल्या साहित्यासह धाव घेतली व दोनशे फूट दरीमध्ये दोरखंडाच्या सहाय्याने उतरत या जखमी तरुणाला सुरक्षित रित्यावर आणले. यावेळी बाबल आल्मेडा टीमचे सदस्य देखील मदत कार्यात सहभागी झाले.
तसेच आंबोली पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, कॉन्स्टेबल अभिषेक कांबळे, कॉन्स्टेबल मनीष शिंदे आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली व पुढील कारवाईसाठी पंचनामा करून जखमींना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. तर १०८ ॲम्बुलन्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार केले.