दीपक केसरकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजवर जनतेसाठी काहीही करू न शकलेले माझ्या विरोधातील उमेदवार आज मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. एक पैशांचा पाऊस पडतोय तर दुसऱ्याच्या खिशातून कार्यकर्त्यांच्या चहाचेही पैसै निघत नसल्याने ते नाखुश आहेत. केवळ जनतेचा व मतदारांचा वापर करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा यांचा हेतू आहे. मात्र सावंतवाडीकर नागरिक तो हेतू कधीही सफल होऊ देणार नाहीत माझ्यावरील प्रेमापोटी विकासाच्या मुद्द्यावर ते मलाच निवडून देतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहरातील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी सौ. पल्लवी केसरकर, सोनाली केसरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, जनतेच्या जमिनी लुबाडणाऱ्याने एक तरी हॉटेल उभारून महिला तसेच युवकांना रोजगार दिला का ते सांगावे. मी पंचवीसशे कोटींची विकासकामे मागच्या पाच वर्षातच केली. जनतेला हेवा वाटावा असं काम मी मंत्री म्हणून केलं आहे. मी तुमची काम केलीत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेलींनी फक्त लोकांना भडकवून आग लावायची काम केली आहेत. यांच्या भाकऱ्या या स्वार्थाच्या आहेत. ते भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देऊ नका तर त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
तर राज्यातील जबाबदारीमुळे मतदारसंघात फिरता आले नसले तरी माझा लक्ष तुमच्यावर असतो. तुमची सगळी कामं मी केली आहेत. २० तारीखला माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आपला विजय निश्चित आहे. मोठं मताधिक्य माझ्यामागे उभे करा असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले. सावंतवाडी शहरातील आठही प्रभागात केसरकर यांच्याकडून झंझावाती प्रचार करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










