खाकीवर्दी रिलॅक्स…!         

 

अपघात झाला… पोलिस, अतिवृष्टी झाली… पोलिस, हाणामारी झाली की पोलिस, समाजात कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही घटना घडली की प्रशासनातील पहिला विभाग समोर येतो तो पोलिस. मग समाजात याच पोलिसांनी काय करायला हवं होतं. पोलिस बहुतेक दबावाखाली असावेत…. इथपासून पोलिसांनी कसं दुर्लक्ष केलं इथपर्यंत सगळ्याच बाबतीत समाजातील प्रत्येक घटनेचा दोष आणि अंगुलीनिर्देश पोलिसांकडेच केलेला असतो. निवडणुका मग कोणत्याही प्रांतात आणि ग्रामपंचायत ते लोकसभा अशा कोणत्याही निवडणुका असल्या तरीही पोलिसांनी काय केलं नाही किंवा काय करायला हवं होतं याच मार्गदर्शन केलं जात. परंतु समाज म्हणून राजकीय कार्यकर्ते, पुढारी म्हणून आपण कोणते तारतम्य पाळलं पाहिजे हे मात्र पाहीले जात नाही. यामुळे पोलिस नेहमीच तणावाखाली असलेले दिसतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान बुधवार २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. राज्यातील अनेक भागांमध्ये अनेक जिल्ह्यात राजकीय राडे झालेले प्रसार माध्यमांवर दाखवले गेले. कोकण प्रांतात मात्र एकदम सन्नाटा होता. निवडणुका जाहीर कधी झाल्या आणि निवडणुका संपल्या कधी हेच मुळी कळलं नाही. इतक्या शांततामय वातावरणात या कोकणात निवडणुका पार पडल्या. सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली भूमिका राजकीय नेते, पुढारी यांच्यातला संयमीतपणा आणि वाद, राडे नकोच हा विचार या सर्वांचा एकत्रित परिणाम यामागे आहे. सर्वसामान्य लोकांना शांततेचं वातावरण हवं असत. कोकणात तसं म्हटलात तर राजकीय चर्चा करायची भारी हौस आहे. एखाद्या गावखेड्यातील साध्या टपरीवजा हॉटेलात बसून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प कसे निवडून आले आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरीस कशा पराभूत झाल्या याची चर्चा कुठल्याही टीव्ही चॅनलवर ऐकण्यापेक्षा कोकणातील एखाद्या ग्रामीण भागातील हॉटेलात होणारी चर्चा एकदम भारीच असते. त्यामुळे जागतिक पातळीवरील चर्चेपासून राज्यातील आणि कोकणातील राजकारणाची चर्चाही तितक्याच शेलक्या शब्दात चर्चेत एक-दुसऱ्याला शालजोडीत सुनावत चर्चा करतील. आपणाला आवडणाऱ्या नेत्याच समर्थन तितक्याच आपलेपणाने अगदी चारचौघात करतील. हे सगळं करत असताना कुठेही वाद होणार नाहीत याचीही काळजी घेतील हे अशाप्रकारे वातावरण तयार झाल्याने कोकणातील खाकीवर्दीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राजकीय राडे आणि हाणामारीत खरंतर काहीच नसतं. परंतु कोणतही कारण नसताना थोड्याशा अविचारातून निर्माण होणारे वाद अनेकवेळा कार्यकर्त्यांनाच सर्वाधिक त्रासदायक ठरू शकतात. याच भान आणि जाणीवही असणं गरजेचं असत. पोलिस त्यांचं काम करणार. कोणतीही घटना घडली की त्याच्या पुढची कार्यवाही जी काही करायची असेल ती पोलिस करतच असतात. परंतु निवडणुका येतात, निवडणुका होतात. निवडून येणारे निवडून येतात. परंतु एखाद्या क्षुल्लक विषयांवरून निर्माण होणारे वाद मन कलुषित करतात. त्यातून गावांचा सलोखाही बिघडवतो. त्यामुळे या सर्वामध्ये सर्वांकडूनच समजूतदारपणा दाखवला गेला तर कोणालाच कोणत्याही प्रकारचा त्रास संभवत नसतो. कोकणातील पोलिस यंत्रणेने त्यांच्या-त्यांच्या स्तरावर पूर्णपणे काळजी घेतलेलीच होती. अगदी कालच्या मतदानादिवशी पोलिस किती काळजी घेत होते याच उत्तम उदाहरणच अनुभवता आलं. असलदे गावी बंदोबस्तासाठी एक हवालदार आणि होमगार्ड तैनात होते. मतदान केंद्रावरच रांगेतच चला, डबल रांग नको, नाहीतर संध्याकाळी भांडण नकोत. अस सहजतेने ते हवालदार पुटपुटले. माझ्या सोबत मतदानासाठी रांगेत असलेल्या ग्रामस्थांनी अगदी हसत-हसत सांगितले ‘हवालदारांनू, काय काळजी करू नको. हयसर तुमका कसलोच त्रास होवचो नाय.’ हे शब्द ऐकूनही मला खूप बरं वाटलं. किती विश्वासाने आपल्या गावचे ग्रामस्थ सांगत होते. ते हवालदारही हे ऐकून खूप सुखावले. ‘मग बराच होयत’, असं बोलून ते आपल्या कामाला लागले. समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा परिणाम जसा समाजावर होतो तसा नाहक अधिक त्रास पोलिसांना होतो. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खाकीवर्दीने आपली जबाबदारी चोख बजावली आहे. मतमोजणीनंतरही कोकणातील वातावरण शांततेतच आणि खाकीवर्दी रिलॅक्स असेल!

*