२६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात मुकेश जाधव शहीद
लांजा (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावरील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या लांजा तालुक्यातील रुण येथील मुकेश जाधव यांना लांजा पोलीस आणि लांजा होमगार्ड यांच्या वतीने आज मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी मानवंदना देण्यात आली.
आर्थिक राजधानी म्हणून अशी ओळख असलेल्या मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता .यावेळी मुकेश जाधव हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आपली सुरक्षा सेवा देत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर मुकेश जाधव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत मार्गदर्शन केले. ही बाब दहशतवाद्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुकेश जाधव यांच्यावर गोळीबार गेला होता. यात मुकेश जाधव हे शहीद झाले होते.
मुकेश जाधव यांचे शौर्य लोकांच्या कायम स्मरणात राहावे या उद्देशाने त्यांच्या रूम या मूळ गावी त्यांचे शहीद स्मारक उभारण्यात आले. आहे या ठिकाणी आज मंगळवारी लांजा पोलीस तसेच होमगार्ड यांनी जाऊन शहीद मुकेश जाधव यांना मानवंदना दिली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते मुकेश जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी लांजा पोलिसांसह, होमगार्डचे समादेशक चंद्रकांत नामे, होमगार्ड जवान, रूण गावचे सरपंच, ग्रामस्थ तसेच रूण शाळा नं. १ चे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











