आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांसह केली पहाणी
आठ दिवसात काम सुरू करण्याच्या दिल्या सूचना
राजापूर (प्रतिनिधी): गेली दीड वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या महामार्गावरिल कोदवली पेट्रोलपंप येथील पुलाच्या एका बाजुच्या रस्त्याचे तसेच वाटूळ पुलाखालील बायबास रोडचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी गुरूवारी सकाळी या दोन्ही ठिकाणी ठेकेदार कंपनीचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली. यावेळी त्यांनी पुढील आठ दिवसात ही दोन्ही कामे सुरू करून तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना संबधितांना दिल्या.
रखडलेली ही दोन्ही कामे मार्गी लागल्यास वाहन चालक व पादचारी यांना दिलासा मिळणार आहे.
बुधवारी मतदार संघात दाखल होताच आ. किरण सामंत यांनी राजापूर मतदार संघात रखडलेल्या कामांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी महामार्गावर वाटुळ येथे प्रलंबित असणाऱ्या बायपास रोडच्या कामाची पहाणी केली. हे काम गेले दीड वर्ष रखडलेले आहे. याची दखल घेत आ. सामंत यांनी या ठिकाणी बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत पहाणी करून तातडीने हे काम मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. पुढील आठ दिवसात हे काम सुरू करण्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर आ. सामंत यांनी कोदवली पेट्रोलपंपाजवळील एका बाजुने रखडलेल्या रस्त्याची पहाणी केली. हा रस्ता रखडल्याने या ठिकाणी गेल्या दिड वर्षात मोठया प्रमाणावर अपघातही झाले आहेत. त्यामुळे आता हे काम तात्काळ सुरू करावे अशा सुचना आ. सामंत यांनी यावेळी उपस्थित ठेकेदार कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सदरचे कामही या आठवडयात सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. ही दोन्ही कामे या आठवडयात सुरू होऊन पुर्ण झाली पाहिजेत, जनतेची गैरसोय होता कामा नये असेही आ. सामंत यांनी यावेळी नमुद केले. या पहाणी प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, सार्वजिनक बांधकाम महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कुमावत, उपअभियंता इंजिनियर एस. एन. शिवानीवर, केसीसी कंपनीचे मॅनेजर श्री. प्रकाश यांच्यासहित विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.











