कुडाळ – मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केलेबाबत व मारण्याची धमकी दीलेबाबतच्या आरोपातून आरोपी प्रमोद उत्तम पालव रा. वरांगाची तुळसुली यांची निर्दोष मुक्तता कुडाळ न्यायालयाने केली आहे. दिनांक 12 एप्रिल 2017 रोजी पिडीत सायंकाळीं 4 वा. चे दरम्याने कुडाळ येथून साळगावला सहासीटरने गेली असता बोरजेवाडी साळगाव येथून घरी ती एकटीच चालत जात असताना 4.15 च्या दरम्यान साळगाव सोनारसाखळी नदीजवळ तिचे पाठीमागून अनोळखी इसम आला व तिला हाताला अचानक पकडले. ओरडशिल तर मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच त्यावेळी आरोपीने पीडितेला माझ्याबरोबर आताच पळून लग्न करशील काय? असा प्रश्न विचारला व मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अशा आशयाची तक्रार पीडितीने कुडाळ पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यानंतर तपास कामांमध्ये सदरहू कृत्य हे प्रमोद उत्तम पालव राह. वरांगाची तुळसुली यांनी केलेले निष्पन्न झाले होते. सबब कुडाळ पोलिसांनी आरोपी प्रमोद उत्तम पालव याचे विरुद्ध भा. द. वि. कलम ३५४,३५४(ड) व ५०६ अन्वये दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरहू केस कामे अंतिम सुनावणी होऊन कुडाळ येथील मे. न्यायदंडाधिकारी साहेब श्री. जी. ए . कुलकर्णी यांनी आरोपी प्रमोद उत्तम पालन यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी प्रमोद उत्तम पालव याच्या वतीने अँड. राजीव बिले, ॲड. संजय खानोलकर, ॲड. हेमांगी वराडकर, आणि ॲड. शुभेश वांजीवाले यांनी काम पाहिले.











