सतीश पाटणकर लिखीत ‘जाऊ तिथे खाऊ ‘ व ‘कोकणातील आयकॉन ‘ पुस्तकांचे थाटात प्रकाशन
साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चारचाँद
सावंतवाडी । प्रतिनिधी : पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाद्य संस्कृती जोपासण्यासाठी सतिश पाटणकर यांचे ‘जाऊ तिथे खाऊ ‘ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल तसेच नव्याने पर्यटन पाॅलीसी ठरविताना खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे व राणे कुटुंबीय निश्चितच खाद्य संस्कृती जोपासली जावी म्हणून धोरण आखतील तर कोकणचे आयकॉन या पुस्तकाच्या माध्यमातून कोकणातील नररत्नांची जन्मगावे व माहिती असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या पुस्तकाची देखील निश्चितच मदत होईल, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.
तब्बल चाळीस वर्षाहून जास्त काळ पत्रकारिता करणारे सावंतवाडीच नव्हे तर अवघ्या कोकणच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे मालवणी भाषेच्या दैनंदिन वापरासाठी आग्रह धरणारे व महाराष्ट्र राज्याच्या तीनपेक्षा जास्त मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी म्हणून काम केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि सावंतवाडीचे सुपूत्र सतीश पाटणकर यांच्या जाऊ तेथे खाऊ हे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित व कोकणातील जी तब्बल ३९ नररत्ने होऊन गेली त्या विविध क्षेत्रातील ज्या महानुभावानी आपल्या कर्तुत्वाचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला त्यांचा आढावा घेणारे दुसरे पुस्तक म्हणजे कोकणातील आयकाॅन या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जेष्ठ कवी व गीतकार प्रा. अशोक बागवे, जेष्ठ साहित्यिक वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर या तिन्ही श्रेष्ठ व जेष्ठ साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत व सावंतवाडी संस्थानच्या एकोणिसाव्या पिढीचे प्रतिनिधी युवराज लखमराजे भोंसले व सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रकाशन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मनीष दळवी यांनी लेखक सतीश पाटणकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रकाशन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व मा. एकनाथ शिंदे यांनी श्री. पाटणकर यांना आवर्जून पाठवलेल्या शुभसंदेशाचे वाचन युवा पत्रकार विनायक गावंस यानी केले तर लेखक सतीश पाटणकर यांचा परिचय व पुस्तकांची त्रोटक माहिती पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह ॲड. नकुल पार्सेकर यांनी करून दिली.
आपल्या मनोगतात लेखक सतीश पाटणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीतील संपूर्ण प्रवास आणि या प्रवासात ज्या असंख्य व्यक्तीनी सहकार्य केले आणि प्रेरणा दिली ज्यामुळे हा संपूर्ण प्रवास सुखमय झाला यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांनी तातडीची आढावा बैठक आयोजित केल्याने पालकमंत्री ना. नितेश राणे यांना तातडीने मुंबईला जावे लागत असल्याने त्यांनी आपल्या शुभेच्छा कळविल्या.
पालकमत्र्यांचे प्रतिनिधी तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी शुभेच्छा देताना “विद्यमान पालकमंत्री हे रिजल्ट ओरीयंटेड काम करणारे असल्याने हा जिल्हा पर्यटन दृष्टीने विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा आखला जाईल आणि त्यासाठी पाटणकरांसारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे सुतोवाच केले. माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले , युवराज लखमराजे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या मालवणी भाषेतील गाऱ्हाण्यानी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.
व्यासपीठावर उपस्थित तिनही जेष्ठ साहित्यिक तसेच युवराज लखमराजे, मनिष दळवी, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्षा सौ. श्वेता शिरोडकर, लोकमतचे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, काव्य मैफिलीचे निवेदन करणारे निवेदक व कवी सुधीर चित्ते, प्रकाशक स्वामीराज प्रकाशनचे जेष्ठ पत्रकार रजनीश राणे, पर्यटन महासंघाचे नंदू तारी या सर्वांचा पाटणकर कुटुंबियांच्या वतीने ह्यद्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पाटणकर यांच्या सौभाग्यवती सौ. ममता पाटणकर, मुलगा दत्तप्रसाद व जावई ऋषिकेश बेर्डे व सर्व पाटणकर कुटुंबिय, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, हरिश्चंद्र पवार, कोमसापचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, पत्रकार सिताराम गावडे, संदीप देसाई, सचिन रेडकर, अनंत जाधव, राजू तावडे, विनायक गांवस, हर्षवर्धन धारणकर, दीपक पटेकर, कल्पना बांदेकर, प्रतिभा चव्हाण, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे पदाधिकारी तसेच सर्व वृत्तपत्र आणि समाज माध्यमांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राला सुपरिचित असणारे व महाराष्ट्राच्या मराठी साहित्य विश्वात ज्यांचं फार मोठं नाव आहे असे जेष्ठ कवी व गितकार प्रा. अशोक बागवे, पन्नास वर्षांपूर्वी सामना या अजरामर मराठी चित्रपटाची निर्मिती ज्यानी केली जे वाञटिकाकार म्हणून प्रसिद्ध आहेतचं पण जे आपल्या वात्रटिकांच्या माध्यमातून दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेल्या सामाजिक आणि राजकीय मुल्यांवर थेट प्रहार करतात ते वात्रटिकाकार रामदास फुटाणे व सामाजिक संवेदनाना आपल्या विनोदी शैलीनी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे घराघरात पोहचलेले हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. जेष्ठ कवी निवेदक सुधीर चित्ते यांनी शब्दांच्या कोटी करीत केलेले निवेदन व तिन्ही जेष्ठ कवींनी सादर केलेल्या हलक्या फुलक्या पण हृदयस्पर्शी कवितांच्या काव्य मैफिलीने उपस्थित रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यानंतर हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या महिलांच्या स्वयंपाकावरील विडंबन कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.











