_जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला दोडामार्ग तालुका दौरा

जनगणना प्रशिक्षणाला भेट आणि नगरपंचायत कामकाजाचा घेतला सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमा का) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दोडामार्ग तालुक्याचा दौरा करत जनगणना २०२७ प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण आणि पंचायत स्तरावरील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी विकासकामांना गती देण्याचे निर्देशही यावेळी दिले.

दौऱ्यादरम्यान नगरपंचायत सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विकासकामांची प्रगती, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांचा सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक रामराव गावकर, मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पारंपरिक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीच्या विषयसूचीत समाविष्ट असलेल्या १९ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहरातील सुरू असलेल्या विकासकामांची माहिती सादर करत पायाभूत सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा आढावा दिला. काही प्रलंबित कामांसाठी शासकीय जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

नागरिकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन आणि सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांचा सहभाग वाढवणे, जनजागृती मोहिमा राबवणे आणि सातत्यपूर्ण निरीक्षण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘माझी वसुंधरा’, ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘प्राणी जन्म नियंत्रण’ यांसारख्या उपक्रमांसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नगरपंचायतीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत काही अपूर्ण कामांबाबत नाराजी व्यक्त केली आणि ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे आयोजित जनगणना २०२७ च्या घरगणना प्रशिक्षणाला भेट देत उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत सरकारतर्फे होणारी ही जनगणना देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये प्रथमच स्वगणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. दोडामार्ग तालुक्याचे विस्तीर्ण क्षेत्र आणि कमी लोकसंख्या लक्षात घेता दुर्गम भागात जाऊन अचूक माहिती संकलित करण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काम करताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत जनगणना प्रक्रिया शिस्तबद्ध, अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी तहसीलदार राहुल गुरव, निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, जनगणना प्रशिक्षक संजय मद्रे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*******