तटरक्षक दिनानिमित्त आंतरशालेय प्रश्नमंजुषा

रत्नागिरी : 01 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या 49 व्या तटरक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने 04 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी त्यांच्या कार्यालय परिसरात आंतरशालेय प्रश्नमंजुषा आयोजित केली.

या कार्यक्रमाला रत्नागिरी येथील स्थानिक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यानुसार रत्नागिरी शहरातील पोदार इंग्लिश स्कूल, नवनिर्माण हाय, माने इंग्लिश स्कूल, सर्वंकष विद्यामंदिर, मराठा मंदिर ग्लोबल स्कूल आणि ईकरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्विझ मास्टर्स असिस्टंट कमांडंट पल्लवी काळे आणि असिस्टंट कमांडंट सुंदरा पांडियन यांनी केले.

चार फेऱ्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय ज्ञान आणि स्पर्धात्मक भावना दाखवून कार्यक्रम रोमांचक बनवला. नवनिर्माण हाय या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले तर ईकरा इंग्लिश मीडियम स्कूल दुसरी ठरली. विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तर इतर सहभागींना प्रमाणपत्र व सांत्वनपर बक्षिसे देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वाचनाची चांगली सवय लावण्याच्या हेतूने प्रत्येकी एक पुस्तकही भेट देण्यात आले.

कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक टीएन उपाध्याय लाभले होते. यावेळी सहभागी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांव्यतिरिक्त तटरक्षक दलाच्या जवानांसह एकूण 120 प्रेक्षक उपस्थित होते.