केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची आदरांजली
देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप
जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करणारे आणि आचरण असलेले आप्पासाहेब
आप्पासाहेबांच्या विचारांचे,कृतीचे कार्यकर्त्यांनी आचरण करावे,मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

देवगड : राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येते अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला.
आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेखाली सोमवारी झाला. यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे शामकांत काणेकर, नकुल पारसेकर, संदीप साटम, बाळ खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडये यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे
यावेळी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याची करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही “यादव” लावले नाही, तसेच परशुरामांनी “शर्मा” लावले नाही. त्यामुळे आपणही जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा.
कार्याची दखल घेतल्याचे वेगळे समाधान
नितीन गडकरी म्हणाले, मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माच्या ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि बोधी वृक्षाखाली उभा असताना वटवृक्षाचे पान माझ्या खांद्यावर पडले. तेव्हा उपस्थित बौद्ध भिकूंनी सांगितले की हे भगवान बुद्धांचे आशीर्वाद आहेत. अशा प्रसंगातून आपण समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते, याचा आनंद होतो.
आप्पांच्या विचाराचे कार्य पुढे नेऊया
आप्पांनी संघ आणि जनसंघासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मृतींना वंदन करताना आपणही त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा. आज देश समृद्ध, शक्तिशाली, आणि विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्याला त्यांच्या विचारांप्रमाणे कार्य करावे लागेल.आप्पांसारख्या कार्यकर्त्यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपण पुढे जाण्याचा संकल्प करूया. त्यांची आत्मा स्वर्गात निश्चितच समाधानी असेल की आपण त्यांचे कार्य पुढे नेत आहोत.
स्वर्गीय आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रत्यय मतदारसंघात फिरताना येतो नामदार नितेश राणे
या कार्यक्रमाची प्रस्तावना माजी आमदार अजित गोगटे यांनी केली. प्रस्तावनेमध्ये, देवगड मतदारसंघात आमदार असताना आप्पासाहेब गोगटे यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला. “मी आमदार झाल्यावर, आप्पासाहेब मलाही आपली मागणी निवेदन देऊन कळवत,” याबाबतही त्यांनी एक मिश्किल किस्सा वर्णन केला. आप्पासाहेबांचे स्वप्न असलेला वरंडवाडी येथील साकव पूर्ण होण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
जुने, जाणते भाजपाचे कार्यकर्ते पू. ज. (उर्फ काका) ओगले यांना स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी समितीच्या वतीने “स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. “आप्पांसारखे नेतृत्व आता पुन्हा राजकारणात होणार नाही. त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याचा आपला प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणी पुस्तक स्वरूपात त्यांच्या चिरंजीव प्रकाश गोगटे यांनी प्रसिद्ध केल्या. तसेच, समितीच्या वतीने “स्मृतिगंध” ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
त्यांचे सहकारी, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, शाम काणेकर, सदाशिव ओगले, आप्पासाहेब गोगटे यांची कन्या (पूर्वाश्रमीच्या शोभा गोगटे), नकुल पार्सेकर, पू. ज. ओगले, स्नेहलता देशपांडे आणि विलास हडकर यांनी आपल्या आठवणी कथन केल्या.
या कार्यक्रमासाठी स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









