कोकणची संस्कृती व सौंदर्य जगभर पोहोचवा, ना. नितेश राणे

“तुमच्या रील्सच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य व संस्कृती जगभर पोहोचवा! तुम्हाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी माझी आहे,” असे मत बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथे व्यक्त केले.

देवगड येथे सोशल मीडियावर रील्स करणाऱ्या क्रिएटर्ससाठी ‘कोकण सन्मान’ हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या वेळी नामदार नितेश राणे यांनी सर्व क्रिएटर्सना उपस्थित राहून प्रमुख पाहुणे म्हणून शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेत्री वनिता खरातही उपस्थित होत्या.

शुभेच्छा देताना नामदार नितेश राणे म्हणाले की.महाराष्ट्रातून आलेले जेवढे क्रिएटर्स इथे आले, त्यांनी या सन्मानाची उंची वाढवली आहे. त्यासाठी मी आमच्या देवगडकरांकडून आणि सिंधुदुर्ग जनतेच्या वतीने सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

कोकण सन्मान 2025कणकवलीतून सुरू झालेला हा प्रवास आता देवगडपर्यंत आला आहे, आणि हळूहळू सिंधुदुर्गच्या इतर तालुक्यांमध्येही आम्ही हा सोहळा घेऊन जाणार आहोत. भविष्यात, मुंबईपर्यंत आणि मग कदाचित दुबईपर्यंत पोहोचू, इतका आमचा आत्मविश्वास आहे. आज कोकणाचा दबदबा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही वाढलेला आहे. त्यामुळे, माझ्या कोकणातील सर्व क्रिएटर्सना एवढेच सांगू इच्छितो—मोठी स्वप्ने पाहा! कारण, ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे.

“कोकण सन्मान पुरस्कार” सुरू करण्यामागचा हेतू एवढाच होता की, आमच्या कोकणातील प्रदेश व संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. आम्ही कोकणाकडे भूमिपुत्र म्हणून पाहतो, तसेच इतरांनीही पाहावे, ही आमची इच्छा आहे. बाहेरगावी जाण्यापेक्षा किंवा लक्षद्वीपकडे पाहण्यापेक्षा, आमचा कोकण त्याहीपेक्षा सुंदर आहे—आमचा सिंधुदुर्ग, आमचं रत्नागिरी!

म्हणून, आपल्या कोकणाबद्दल आपण जितके बोलू शकतो, तितके कमीच आहे! माझ्या कोकणातील सर्वच क्रिएटर्स मला अभिमान आहे. कारण, तुम्ही तुमच्या गावात राहून, तुमच्या घरातूनच आमच्या कोकणाला बाहेरच्या जगात दाखवत आहात. त्यामुळे, कोकणाची चर्चा होते आहे, आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

“कोकण सन्मान” हे तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे, आणि ते इथंच थांबणार नाही! तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे, तुम्ही तुमच्या माध्यमातून कोकणाची संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि सौंदर्य बाहेरच्या जगाला दाखवत राहा. आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे बाहेरच्यांनीही मान्य करायला हवं. इतके सुंदर काम करा!

पर्यटनाच्या दृष्टीनेही कोकणासाठी हा महत्त्वाचा काळ आहे. गोव्यामध्ये पर्यटन क्षेत्रात जरी मंदी आली असली, तरी हीच वेळ आहे आपल्या कोकणाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याची, त्याबद्दल बोलण्याची आणि प्रोत्साहन देण्याची. त्यामुळे, माझ्या क्रिएटर्सना एवढंच सांगेन—तुम्ही पुढची पावले टाकत असाल, तर आता आणखी पुढे जा. तुमच्या कंटेंटच्या माध्यमातून कोकणाचा गोडवा जगभर पोहोचवा.

आज “कोकण सन्मान” च्या निमित्ताने मी येथे आलो आहे. अनेकदा हा सोहळा असतो, कारण, तुम्ही आमचे हक्काचे आहात. तुम्ही जितके मोठे व्हाल, तितका आमचा कोकण मोठा होईल—हीच आमची भावना आहे.

म्हणून, या “कोकण सन्मान” सोहळ्यात योगदान देणाऱ्या अभिषेक तेंडुलकर आणि त्याच्या संपूर्ण टीमचे, तसेच धडपड करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! आज, देवगडकरांनी महाराष्ट्राला नितेश राणे दिला आणि त्यांनीही या सोहळ्याला उदंड प्रतिसाद दिला, हे पाहून आनंद होतो. अशा शब्दात नामदार नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केले 

(कोकण सन्मान चा निकाल लवकरच सविस्तर प्रसिद्ध करत आहोत )