माठेवाड्यात मासे विक्रेत्याचा बंद खोलीत मृतदेह 

आजारपणामुळे मृत्यूचा प्राथमिक अंदाज

सावंतवाडी: माठेवाडा भागात एका घरात बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (वय ४५) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह सुमारे दोन दिवसांपूर्वीचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मूळचे शिरोडा येथील असलेले शैलेश तारी यांना आठवडाभरापूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या आजारपणामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार गुरुदास नाईक, पवन परब, महेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.