सावंतवाडी । प्रतिनिधी : शैक्षणिक गुणवत्तेसाठी नावाजलेल्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने (YBIS) यंदापासून ११ वी विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनियर कॉलेज) सुरू करण्याची घोषणा केली आहे. शहरानजीक महादेव भाटले येथील प्रशालेत यंदापासून विज्ञान शाखेचे शिक्षण दिले जाणार असून, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला आणि वैज्ञानिक विचारांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे, अशी माहिती भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि मार्गदर्शन कक्ष
कनिष्ठ महाविद्यालयासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भोसले कॉलेजसह इतरही ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास YBIS कॉलेजच्या मार्गदर्शन कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे. ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांच्या यशानंतर पुढील टप्पा
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने गेल्या दहा वर्षांत प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. याच यशाचा पुढील टप्पा म्हणून जून-२०२५ पासून हे ज्युनियर कॉलेज सुरू होत आहे. हे कॉलेज महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी (HSC Board) संलग्न आहे. YBIS ज्युनियर कॉलेज हे सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी शिक्षणासाठी कटिबद्ध असून, इतर शाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, जिज्ञासूपणा आणि कौशल्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा या उद्देशाने विज्ञान शाखा सुरू करण्यात येत असल्याचे श्री. भोसले यांनी नमूद केले.
अत्याधुनिक सुविधा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी
पुढील वर्षापासून १२ वी विज्ञान शाखा देखील सुरू करण्यात येणार आहे. सध्या ८० विद्यार्थ्यांना प्रवेश उपलब्ध असून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, आणि संगणक आदी विषय प्रशालेत उपलब्ध आहेत. विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित तज्ञ प्राध्यापक वर्ग असून, प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. NEET, JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. जिज्ञासा आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. विज्ञान अभ्यासक्रम आणि उत्साही शैक्षणिक वातावरणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे अच्युत सावंत भोसले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि प्राचार्या प्रियांका देसाई आदी उपस्थित होते.












