राजापुरात मुसळधार ! जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला आपत्कालीन आढावा

राजापूर | प्रतिनिधी:

राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारी सायंकाळी राजापूर शहरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

तत्पूर्वी त्यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

 

राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पावसामध्ये उद्भवणाऱया नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी सोमवारी राजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

राजापूर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह यांनी तालुक्यातील सर्व विभागांच्या व्यवस्थापना तसा नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या उपायोजनांबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसच धोपेश्वर खंडेवाडीसह अन्य सर्व दरडग्रस्त भागात विशेष दक्षता घेण्यास त्यांनी यावेळी प्रशासनाला सांगितले.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीची पाहणी केली. तसा राजापूर शहरातील पुरपरिस्थितीत पाण्याखाली जाण्याऱया वीज ट्रान्स्फार्मरचीही पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी डॉ.जॅसमिन, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव, महावितरणो श्री.शिरसागर यांच्यासह विविध प्रशासकीय विभागाचेअधिकारी उपस्थित होते.