गणपतीला कोकणात जायचे कसे?; चाकरमान्यांचा प्रश्न
खेड । देवेंद्र जाधव
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे. महामुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणपतीकरिता गावी जायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ट्रेनची ऑनलाइन तिकीट विक्री पहिल्या तीन मिनिटांमध्ये फुल्ल झाली. तर, पुढच्या तासभरात सर्व गाड्या ‘रिग्रेट’ झाल्याने चाकरमान्यांना वेटिंग तिकीटही मिळाले नाही. दुसरीकडे तिकीट खिडक्यांवरही तासन् तास थांबूनही तिकीट मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव आणि शिमगोत्सवासाठी हे कोकणातील मोठे सण असून, चाकरमानी आवर्जून त्याकरिता गावी जातात. आता नियमानुसार दोन महिने अगोदरच गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. परंतु, बुकिंग सुरु होताच पहिल्या दोन ते तीन मिनिटांतच ट्रेन फुल्ल झाल्या
यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरू होत आहे. त्यानिमित्त २५ ऑगस्टला गावी जाण्यासाठी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना , २६ जून रोजी तिकीट मिळालेच नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जायचे कसे, असा प्रश्न चाकरमानी विचारत आहेत.
विशेष गाड्यांबाबतही बोंब
मुंबई-ठाण्यातून कोकणात तसेच कोकणमार्गे १८ पेक्षा जास्त ट्रेन जातात. या सर्व गाड्या एवढ्या कमी कालावधीत कशा फुल्ल होत आहेत. वेटिंग तिकीटही कसे मिळत नाही, असा प्रश्न चाकरमानी विचारत आहेत. तिकीट खिडकीवर पहाटे ४ वाजल्यापासून रांगेत उभे राहिल्यावरही केवळ पहिल्या चार प्रवाशांनाच तिकीट मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या बाबतही असाच अनुभव प्रवाशांना आहे.
गाड्यांचे डबे वाढवा
गणेशोत्सवासाठी कोकण मूळ गावी जाण्यासाठी चाकरमानी उत्सुक असतात. परंतु, ट्रेनमध्ये आसने मर्यादित असते. त्यामुळे वाढत्या मागणीपुढे त्यांची संख्या अत्यंत तुटपुंजी असते. त्यामुळे सर्व गाड्या अवघ्या दोन मिनिटांत भरतात, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे डबे १६ वरून २२ केल्यास आणखी जास्त प्रवासी सामावून घेता येतील. : अक्षय महापदी,अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती










