शोध मोहीम सुरू असेपर्यंत पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद

आंबोली : कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या राजेंद्र बाळासो सनगर (४५, रा. कोल्हापूर) या युवकाचा शोध घेण्यासाठी आज शनिवार सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी कावळेसाद येथील रेलिंगला टेकून फोटो काढत असताना सनगर यांचा तोल जाऊन ते ४०० फूट खोल दरीत कोसळले होते. दाट धुके आणि अंधारामुळे त्यांना शुक्रवारी रात्री शोधता आले नव्हते.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेसाठी स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम, सांगली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम, आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एनडीआरएफ (NDRF) ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही शोधकार्यात सहभागी झाले आहेत. सह्याद्री ऍडव्हेंचर्स आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगली यांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू आहे.
युवकाचा शोध आणि बचावकार्य सुरू असेपर्यंत, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कावळेसाद हे पर्यटन स्थळ स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचेही पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले.













