सिंधुदुर्गात ‘जेल पर्यटन’ संकल्पना साकारु शकते : आ. दीपक केसरकर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे जिल्हा कारागृह आहे. येथील गुन्ह्यांची संख्या पाहता ते पुरेसे आहे. त्यामुळे सावंतवाडीतील संस्थानकालिन ऐतिहासिक कारागृह हे पर्यटनासाठी वापरून

‘जेल पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबवता येऊ शकते, यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला एक नवी दिशा मिळेल, असे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि एकत्र काम करण्याच्या वृत्तीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी चालना मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.

पालकमंत्री नितेश राणे यांनी, केसरकर यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, असे विधान केले होते. याबाबत विचारले असता, केसरकर यांनी राणे यांच्या समजूतदारपणाचे आणि वाद टाळण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. नौका बुडवण्याच्या घटनेवेळी वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाही, राणे यांनी समंजस भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या ॲक्वेरियममुळेही पर्यटन विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले.

आमदार केसरकर यांनी ‘जेल पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमी गुन्हेगारी दर पाहता, ओरोस येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे १५० वर्षांपूर्वीचे असून, ते आता रिकामे झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर सर्व कैद्यांना ओरोस येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक कारागृहाचा उपयोग ‘जेल पर्यटन’ साठी करता येईल. यामुळे पर्यटकांना एक वेगळा आणि अनोखा अनुभव मिळेल, तसेच सिंधुदुर्ग हे पहिले ‘जेल पर्यटन’ केंद्र म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने, असे अभिनव पर्यटन उपक्रम सुरू झाल्यास त्याचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल, असे केसरकर यांनी सांगितले.

यावेळी, केसरकर यांनी राजकीय विषयांवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे हे फतव्यांच्या मतांवर अवलंबून असून, त्यांना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यावर पुन्हा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत, “यूझ ॲण्ड थ्रो’ ही उद्धव ठाकरे यांची नीती असून, मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे,” असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात मारामाऱ्या आणि भांडणे नको अशी अपेक्षा व्यक्त करत, मराठीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.