‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ मालवण पंचायत समिती जिल्ह्यात अग्रेसर

आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून घेतला आढावा :

देशपातळीवर नावलौकिक करावा असे सांगत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या कामाचे केले कौतुक

मालवण | प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समितीने अग्रेसर राहून आदर्शवत असे काम केले आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वात मालवण पंचायत समितीची ही भरारी सर्वच क्षेत्रात राज्य व देशपातळीवर नावलौकिक करावी. असे कौतुकोदगार आमदार निलेश राणे यांनी मालवण पंचायत समिती येथे बोलताना व्यक्त केले. आमदार म्हणून आपण सदैव सोबत असल्याचा विश्वासही सर्वाना दिला.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत मालवण पंचायत समितीने 118 टक्के पेक्षा जास्त टार्गेट पूर्ण केले आहे. अभिप्राय नोंदणी व सर्वेक्षणात जिल्हा स्तरापेक्षा दुप्पट अशी ही भरारी आहे. सर्वेक्षण अभियान शेवटच्या दिवशी या संपूर्ण कामाचा आढावा आमदार निलेश राणे यांनी पंचायत समिती येथे उपस्थित राहून गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडून घेतला. तसेच या अभियानात आपला अभिप्रायही नोंदवला आहे.

यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध घटकांतुन 1 हजार गुण निश्चित करण्यात आले आहेत. यात क्षेत्रीय स्तरावरील निरीक्षणे, कुटुंब स्तर सर्वेक्षण, शाळा अंगणवाडी, पंचायत, घर, बाजार, सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, तीर्थक्षेत्र येथील स्वच्छता पडताळणी, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोवर्धन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प यांची कार्यात्मता पडताळणी, कुटुंबांशी चर्चा व मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून् प्रतिसाद जाणून घेतले जात आहे. यासह अन्य सर्व निकषात मालवण पंचायत समिती अग्रेसरपणे जिल्ह्यात कार्यरत आहे. हा सर्व आढावा घेताना गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.