रानभाज्यांचे महत्व व व्यवसाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी,  : जंगलात शेकडो रानभाज्या आढळतात. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेतल्यास रानभाज्यांची अधिक माहिती मिळू शकते. या रानभाज्यांचे महत्व, त्याचे व्यवसायीकरण आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

येथील अंबर सभागृहात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, रोटरीचे प्रमोद कुलकर्णी, ॲड. स्वप्नील साळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, राहुल पंडीत, बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, “हा रानभाजी महोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्हावा यासाठी नियोजन करावे. विशेषतः श्रावण महिन्यात रानभाज्या सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध होतात. आरोग्यासाठी त्यांचे महत्व अमूल्य आहे. त्याचबरोबर रानभाज्यांचा व्यवसायही चांगला होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले की, आंबा उत्पादक बागायतदारांसाठी बोलेरो वाहने दिली आहेत, अजून १०० बोलेरो शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असून त्या तंतोतंत पोहोचल्या पाहिजेत. जिल्ह्यातील ५,५०० शेतकऱ्यांना भात व नाचणीचे बियाणे मोफत दिले आहेत. दोन लाख खैर रोपांचे वाटप करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना बळ मिळावे तसेच रानभाज्यांच्या मार्केटिंगसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा.

या कार्यक्रमात आंबा उत्पादक बागायतदारांसाठी वाहतूक वाहन निधीचे वितरण, प्रक्रियाधारकांसाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन, तसेच आंबा उत्पादन व मत्स्य व्यवसायाच्या आयात-निर्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाले.