गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात रान रेड्यांकडून मोठे नुकसान होत आहे.शिवाय दिवसा ढवळ्या पुढ्यात येत असल्याने गावातील नागरिक,वाहन चालक भीतीच्या छायेत वावरत आहेत.
गतवर्षी गावातील पकडेवाडी,भुवड वाडी च्या भागात व त्या बाजूला तुरळ हरेकरवाडी कडील डोंगराळ व गवताळ भागात हे गवे रेडे मोठ्या संख्येने आढळून येत होते.अनेकांना कळपाला पंधरा हून अधिक रानरेडे दृष्टोसपतास पडले होते.परंतु सध्या संपूर्ण गावातच हे रानरेडे दृष्टीस पडत आहेत.चक्क आरवली आंबव पोंक्षे व आंबव पोंक्षे सरंद या रस्त्यावर झुंडीने हे रानरेडे दिसत असल्याने पादचारी,दुचाकीस्वार, कार चालक ये जा करायला कचरत आहेत.
या रानरेड्यांकडून नव्याने लागवड केलेल्या आंबा काजूंच्या झाडांची नासधूस सुरु आहे.झाडें पिळवटून टाकत असल्यामुळे एक एका शेतकऱ्याची शेकडोनी केलेली काजू आंबा लागवड नेस्तनाबूत झाली आहे.शिवाय या वर्षी पकडेवाडी,भुवड वाडी या भागातील पावटा,चवळी कुळीथ,कडव्याची,शेती चरल्या मुळे शेतातून काहीच उत्पन्न हाती लागले नाहीत.
सध्या आंबव पोंक्षे गावात वन्य जीवांकडून मोठे नुकसान होत आहे.माकडांकडून आंबा,चिकू,केळी,शेवगा,पपई,फुलझाडे, यांचे नुकसान,तर डुक्करांकडून आरारोठ,कणगरे,आदींचे नुकसान.त्यात आता रानरेड्यांची भर पडली आहे.
गावात दिवसा ढवळ्या कोल्हे देखील पहायला मिळत आहेत.गावात आधीच असलेली बिबट्यांची दहशत व आता रान रेड्यांची भीती यामुळे गावातील ग्रामस्थ आपल्या स्वतःच्या जागेत,डोंगराळ भागात शेतीच्या कामाला जायला देखील कचरत आहेत.
रानरेड्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच शेखर उकार्डे यांच्या सह ग्रामस्थानी केले आहे.











