बोरीवली मार्गावरील सर्वाधिक ७४ गाड्या आरक्षित
लांजा (प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमानी प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा एसटी आगार सज्ज झाले असून चाकरमान्यांसाठी दि. २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत
१६८ गाड्या आरक्षित झाल्या आहेत. बोरीवली मार्गावर सर्वाधिक ७४ एसटी बस आरक्षित करण्यात आल्याची माहिती लांजा एसटी आगाराकडून देण्यात आली आहे.
यावर्षी दि.२७ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या गणेशोत्सवासाठी लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावी दाखल झाले होते. मंगळवारी २ सप्टेंबर रोजी गौरी गणपतीच्या विसर्जन झाल्यानंतर मुंबई चाकरमान्यांनी परतीचा प्रवास धरला आहे. या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगार सज्ज झाले आहे. दिनांक २ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मुंबई मार्गावर २३, परेल मार्गावर ५ बस, बोरीवली मार्गावर ७४ बस, कल्याण ११ बस फेऱ्या, ठाणे ३ बस फेऱ्या, नालासोपारा १२ बस फेऱ्या, डोंबिवली २ बस फेऱ्या, दिवा बस फेऱ्या, विरार ८ बस फेऱ्या याप्रमाणे १६८ बसफेऱ्या आरक्षित झाल्या आहेत.
एसटी बसला तालुक्यातील प्रवाशांची चांगली पसंती असून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळे या सर्व एसटी फेर्यांचे आगारा मार्फत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे .
दरम्यान अद्यापही प्रवाशांकडून एसटी बस आरक्षित करण्याचे सुरू असून आणि त्यात मागणी वाढल्यास आणखी काही फेऱ्या आरक्षित होऊ श५कतात अशी माहिती देखील लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी दिली.












