रत्नागिरी आगाराचा अनागोंदी कारभार प्रवाशांना पावणे दोन तास ठेवले ताटकळ

महिला प्रवाशांचा संताप

जैतापूर | वार्ताहर : मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता सुटणारी रत्नागिरी–आंबोळगड ही गाडी तब्बल पावणे दोन तास उशिरा सुटली. या गाडीसाठी थांबलेल्या सुमारे ५० ते ६० प्रवाशांना व महिला, लहान मुले व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना याचा नाकह मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरी आगाराच्या या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रत्नागिरी आगारात सायंकाळी सहा वाजता आलेली ही बस पंक्चर झाल्याने तातडीने डेपोत नेण्यात आली. प्रवाशांनी वारंवार कंट्रोल केबिनला विचारणा केली, परंतु त्यांना प्रत्येक वेळी गाडी आता येईल असेच उत्तर मिळाले. याबाबत काही प्रवाशांनी जैतापूरचे पत्रकार राजन लाड यांच्या निदर्शनास आणली. लाड यांनी कंट्रोल केबिन आणि आगार प्रमुख श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी आगार प्रमुखांकडूनकर्मचाऱ्यांची कमतरता, आधी आलेल्या गाड्या पहाव्या लागणे आणि इतर तांत्रिक अडचणी यांसह अनेक कारणे सांगितली गेली. मात्र यानंतर लगेच गाडी स्थानकात दाखल झाली.

मात्र केवळ पंचर काढण्यासाठी पावणेदोन तास लागत असतील, तर काही मोठे काम झाले असते तर किती वेळ लागला असता? असा सवाल प्रवाशांतुन उपस्थित केला जात आहे.

अशा परिस्थितीत दुसरी गाडी उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही आगार प्रशासनाने ती दिली आहे. गाडी उशीरा सुटल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. रत्नागिरी आगाराच्या या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.